World Athletics Championships : नीरज चोप्राची देशासाठी पुन्हा ‘विक्रमी’ कामगिरी; मोदी म्हणाले, “आमच्या सर्वात..”

WhatsApp Group

मुंबई : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं यूएसए, यूजीन येथे १८व्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकलं आहे. त्यानं ८८.१३ मीटर भालाफेक करून हे पदक मिळवलं. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ९०.४६ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकलं. भारताचा रोहित यादवही याच स्पर्धेत होता. तो ७८.७२ मीटर भालाफेक करून दहाव्या स्थानावर राहिला.

मोदी म्हणाले…

नीरज चोप्रानं इतिहास रचल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं. “आमच्या सर्वात प्रतिष्ठित खेळाडूंपैकी एक नीरजचं आणखी एका महान कामगिरीबद्दल अभिनंदन. भारतीय खेळांसाठी हा खास क्षण आहे. नीरजला त्याच्या आगामी प्रयत्नांसाठी शुभेच्छा”, असं ट्वीट मोदींनी केलं आहे.

नीरज चोप्रानं चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर लांबीची फेक केली. त्याचवेळी ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सनं सुवर्णपदक पटकावले. त्यानं शेवटच्या थ्रोमध्ये ९०.५४ मीटर अंतरावर फेक केली. चेक प्रजासत्ताकच्या जेकोब वडलेनं कांस्यपदकासह तिसरं स्थान पटकावलं. त्यानं ८८.०९ मीटर अंतरावर आपली सर्वोत्तम फेक केली. त्याचवेळी पाकिस्तानच्या अर्शद नदीमचाही या स्पर्धेत सहभाग होता. तो पाचव्या स्थानावर राहिला. त्याची सर्वोत्तम कामगिरी ८६.१६ मीटर होती.

नीरजचा विक्रम!

३९ वर्षीय जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचं भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. भारताला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. तब्बल १९ वर्षांनंतर या चॅम्पियनशिपमध्ये भारताला पदक मिळाले आहे. नीरजच्या आधी अंजू बॉबी जॉर्जनं २००३ मध्ये लांब उडीत कांस्यपदक जिंकलं होतं. या चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तसंच, या चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे.

नीरजने गेल्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये १२० वर्षांचा दुष्काळ संपवला आणि भारतासाठी ट्रॅक आणि फील्ड प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप प्रथम १९८३ मध्ये आयोजित करण्यात आली होती. २४ वर्षीय नीरज कोपराच्या शस्त्रक्रियेमुळे जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या गेल्या मोसमात खेळू शकला नाही. २०१७च्या मोसमात तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नव्हता.

नीरजला यश सहज मिळत गेलं नाही. यासाठी त्यानं खूप त्याग केला आहे. एकेकाळी त्यानं घरच्यांशी बोलणंही कमी केलं होतं. सोशल मीडियापासून दूर राहिला. नीरज संयुक्त कुटुंबात राहतो. त्याच्या आई-वडिलांशिवाय तीन काका आहेत. एकाच छताखाली राहणाऱ्या १९ सदस्यांच्या कुटुंबातील १० चुलत भावांमध्ये नीरज हा सर्वात मोठा आहे. तसा तो कुटुंबाचा लाडका आहे.

Leave a comment