Women’s Asia Cup Final : टीम इंडिया सातव्यांदा आशिया चॅम्पियन; फायनलमध्ये श्रीलंकेचा उडवला धुव्वा!

WhatsApp Group

India vs Sri lanka Women’s Asia Cup Final : भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आशिया खंडात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महिला आशिया चषक २०२२ चा अंतिम सामना शनिवारी (१५ ऑक्टोबर) भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. यामध्ये टीम इंडियाने श्रीलंकन ​​संघाचा ८ विकेट्सनी पराभव केला. श्रीलंकेच्या पराभवासह भारतीय महिला संघाने आशिया चषकाच्या इतिहासात सातव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. तर मोठी गोष्ट म्हणजे आशिया चषकाचे आतापर्यंत फक्त ८ हंगाम झाले आहेत. म्हणजेच एक हंगाम वगळता प्रत्येक वेळी भारतीय संघ चॅम्पियन ठरला आहे. बांगलादेशने गेल्या वेळी एक हंगाम जिंकला होता.

यावेळी महिला आशिया चषक यजमान बांगलादेशमध्ये खेळला गेला. फायनलसह सर्व सामने सिल्हेटमध्ये खेळले गेले. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो सपशेल चुकीचा ठरला. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला ९ विकेट्सवर ६५ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात भारतीय महिला संघाने ८.३ षटकांत २ गडी राखून लक्ष्य गाठले. वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने ५ धावांत ३ बळी घेतले. दुसरीकडे स्मृती मंधानाने नाबाद ५१ धावांची खेळी केली. महिला आशिया कपमध्ये भारताने एकूण ७ वेळा विजेतेपद पटकावले आहे. यामध्ये ४ एकदिवसीय तर २ टी-२० विजेतेपदांचा समावेश आहे. या संघाने २००४ मध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते.

हेही वाचा – Viral Video : पुण्याच्या बसमध्ये अचानक ओरडू लागला प्रवासी..! काय झालं? तुम्हीच बघा

पुरुष गटात भारताने येथे ७ विजेतेपदे जिंकली आहेत. धोनीने कर्णधार म्हणून एकदाच एकदिवसीय आणि टी-२० चे विजेतेपद पटकावले होते. मोहम्मद अझरुद्दीनने त्याच्या नेतृत्वाखाली दोनदा एकदिवसीय आशिया चषक जिंकला आहे. त्याचवेळी रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर आणि सुनील गावसकर यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एकदा भारताला एकदिवसीय आशिया चषकाचे विजेतेपद मिळवून दिले आहे.

Leave a comment