WI vs IND : 7 खेळाडू भारताच्या टी-20 संघातून बाहेर! आगरकरचा ‘बोल्ड’ निर्णय

WhatsApp Group

Team India Squad West Indies T20 Series : वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी निवड समितीने बुधवारी संघाची घोषणा केली. 5 सामन्यांच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना स्थान देण्यात आले नाही. कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे तर उपकर्णधार सूर्यकुमार यादवकडे आहे. यापूर्वीही हे दोघेही ही जबाबदारी पार पाडत होते. या वर्षाच्या सुरुवातीपासून अवघ्या 5 महिन्यांत संघाचे चित्र बदलले आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून तेथे कसोटी, वनडे तसेच टी-20 मालिका खेळणार आहे. नवीन चीफ सिलेक्टर अजित आगरकरच्या नियुक्तीनंतर टी-20 मालिकेसाठी संघाची निवड करताना कसोटी आणि एकदिवसीय संघ आधीच जाहीर करण्यात आले होते. या संघात काही नवीन चेहऱ्यांना स्थान देण्यात आले, तर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली.

भारतीय क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांनी आता हे पूर्णपणे स्पष्ट केले आहे की टी-20 हा तरुणांचा खेळ आहे आणि यामध्ये तरुणांना जास्तीत जास्त संधी दिली जाईल. रोहित शर्मा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या वरिष्ठ खेळाडूंना यापुढे टी-20 संघात स्थान मिळू शकलेले नाही.

हेही वाचा – IPL 2024 मध्ये पाकिस्तानचा मोहम्मद आमिर खेळणार?

2022 मध्ये ऑस्ट्रेलियात आयसीसी टी-20 विश्वचषक झाल्यापासून भारतीय टी-20 संघात वरिष्ठ खेळाडूंना कमी संधी देण्यात आल्या आहेत. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर वर्ल्डकपनंतर खेळायला गेलेला संघ पाहिला तर आजच्या संघात फार कमी खेळाडू आहेत. टी-20 संघातून 7 नावे गायब झाली आहेत. काही खराब फॉर्ममुळे बाहेर बसले आहेत तर काही दुखापतग्रस्त आहेत.

भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका खेळली. या संघात असलेले राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, शिवम मावी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर आणि जितेश शर्मा 7 खेळाडूंचा आज संघात समावेश नाही. पृथ्वी शॉ, राहुल त्रिपाठी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी संधी गमावली. या सर्व खेळाडूंनी मिळालेली संधी वाया घालवली.

कर्णधार हार्दिक पांड्याशिवाय उपकर्णधार सूर्या, यष्टीरक्षक इशान किशन, सलामीवीर शुबमन गिल, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि उमरान मलिक यांनी या संघात आपले स्थान कायम राखले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा हे नवे चेहरे आहेत तर अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि आवेश खान यांना पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे.

टी-20 सामने

  • पहिली टी-20 – 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
  • दुसरी टी-20 – 6 ऑगस्ट, गयाना
  • तिसरी टी-20 – 8 ऑगस्ट, गयाना
  • चौथी टी-20 – 12 ऑगस्ट, फ्लोरिडा
  • पाचवी टी-20 – 13 ऑगस्ट, फ्लोरिडा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment