WI vs IND 2nd T20 : गयाना येथे रंगलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. निकोलस पूरनच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारताला 2 गड्यांनी हरवले. या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजच्या घातक गोलंदाजापुढे भारताचे आघाडीचे फलंदाज ढेपाळले. तिलक वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला 153 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 18.5 षटकात विजय मिळवला. या विजयासह त्यांनी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताचा डाव
भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. भारताने केवळ 18 धावांत 2 गडी गमावले. प्रथम अल्झारी जोसेफने शुबमन गिलला शिकार बनवले. 7 धावा करून गिल झेलबाद झाला. यानंतर पुढच्याच षटकात सूर्यकुमार यादव (1) धावबाद झाला. टीम इंडियाने 60 धावसंख्येवर तिसरी विकेट गमावली. रोमॅरियो शेफर्डने इशान किशनला क्लीन बोल्ड केले. इशानने 27 धावा केल्या. यानंतर फिरकी गोलंदाज अकिल होसेनच्या चेंडूवर संजू सॅमसन यष्टीचीत झाला. संजूने 7 धावा केल्या. युवा फलंदाज तिलक वर्माने हार्दिक पांड्यासोबत संघाला शतकापार पोहोचवले. तिलकने आपले पहिले आंतरराष्ट्रीय टी-20 अर्धशतक साकारले. तिलकने 5 चौकार आणि एका षटकारासह 51 धावा केल्या. अकिलने त्याला झेलबाद केले. 114 धावांवर भारताचा अर्धा संघ गारद झाला. कप्तान हार्दिक पांड्याही (24) मोठी खेळी करू शकला नाही. 20 षटकात भारताने 7 बाद 152 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, रोमॅरियो शेफर्ड यांना प्रत्येकी 2 बळी मिळाले.
West Indies 2⃣ – 0⃣ India
This is the first time West Indies have defeated India in two consecutive T20Is since 2016 🤯#CricketTwitter #WIvsIND #WIvIND pic.twitter.com/4nzPCeqqb3
— Cricbuzz (@cricbuzz) August 6, 2023
हेही वाचा – AI करणार नव्या संसद भवनाचे रक्षण, दरवाजांवर असेल खास डिव्हाईस!
वेस्ट इंडिजचा डाव
153 धावांच्या लक्ष्याला उत्तर देताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी 32 धावांत तीन विकेट गमावल्या. हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात दोन मोठे धक्के दिले. त्याने ब्रेंडन किंग (0) आणि जॉन्सन चार्ल्स (2) यांना बाद केले. यानंतर अर्शदीप सिंगने काइल मेयर्सला (15) आपला बळी बनवला. 89 धावांवर वेस्ट इंडिजला चौथा मोठा धक्का बसला. भारतीय कर्णधार पांड्याने वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलला झेलबाद केले. पॉवेलला केवळ 21 धावा करता आल्या. निकोलस पूरनने 6 षटकार आणि 4 चौकारांसह 67 धावा केल्या. मुकेश कुमारने त्याला तंबूत पाठवले. त्यानंतर शिमरोन हेटमायर (22) बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिज थोडा संकटात सापडला होता, पण अकिल होसेनने नाबाद 16 धावा काढत संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून हार्दिक पांड्याने 3 बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing 11
भारत – शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज – काइल मेयर्स, ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कप्तान), जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, काइल मेयर्स, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅक्कॉय.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!