जेव्हा ‘भूता’च्या भीतीनं सौरव गांगुलीनं सोडलं होतं हॉटेल..! काय घडलं होतं?

WhatsApp Group

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा ‘दादा’ म्हणजे सौरव गांगुली. मैदानावरही तो चांगल्या भाषेत ‘दादागिरी’ करायचा. आपल्या खेळाडूंची पाठराखण असो, वा इतरांना भिडणं असो, गांगुली पुढं असायचा. आता तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम मोडीत काढले. क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापासून ते बीसीसीआयच्या अध्यक्षपदापर्यंतचा त्याचा प्रवास खूप रंजक राहिलाय. दादाची कारकीर्द जितकी वादांनी वेढलेली होती, तितकीच आश्चर्यकारक घटनांनीही भरलेली आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.

काय घडलं होतं?

२००२ साली इंग्लंडमध्ये सौरव गांगुलीसोबत अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी भारत विरुद्ध इंग्लंड सामना खेळवण्यात येणार होता. भारतीय संघ लंडनच्या प्रसिद्ध लुम्ली कॅसल हॉटेलमध्ये उतरला होता. गांगुली ज्या खोलीत राहत होता, त्या खोलीत रात्री अचानक बाथरूमचा नळ स्वतःच सुरु झाला. पाण्याचा आवाज ऐकून सौरव गांगुलीला जाग आली आणि नळ बंद करण्यासाठी तो उठला पण नळ बंद होता. यानंतर तो पुन्हा झोपायला गेला, पण थोड्या वेळानं पुन्हा नळातून पाणी पडण्याचा आवाज आला. गांगुली पुन्हा बंद करायला गेला तेव्हा पुन्हा नळ बंद होता. असं ३ वेळा घडलं. हा प्रकार पाहून सौरव गांगुली चांगलाच घाबरला होता.

या संपूर्ण घटनेचा उल्लेख माजी क्रिकेटपटू इयान बोथम यांचं आत्मचरित्र ‘बीफीज क्रिकेट टेल्स’मध्ये करण्यात आला आहे. हा किस्सा आठवताना गांगुली म्हणाला, ”मला खोलीतील नळ चालू असल्याचा आवाज वारंवार ऐकू येत होता. पण मी जाऊन पाहिलं तेव्हा नळ आधीच बंद होता. त्यामुळं हे स्वप्न असावं किंवा दुसऱ्या खोलीतून पाण्याचा आवाज येत असेल, असा विचार करुन मी पुन्हा झोपायला गेलो. पण पुन्हा नळ सुरू झाल्याचा आवाज येऊ लागला. त्या प्रकारानंतर मी चांगलाच घाबरलो होतो. पण त्यावेळी मी भारतीय संघाचा कर्णधार होतो त्यामुळे याबाबत मी कोणत्याही खेळाडूला सांगू शकलो नव्हतो.” त्यानंतर गांगुली रॉबिन सिंगच्या खोलीत जाऊन झोपला होता आणि दुसऱ्या दिवशी त्यानं हॉटलंच सोडलं होतं.

दादाची कारकीर्द

दादानं १९९२ मध्ये ब्रिस्बेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्यानंतर १९९६ मध्ये तो लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. गांगुलीचा शेवटचा कसोटी सामना २००८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात झाला होता. या सामन्यात धोनीनं गांगुलीला नेतृत्व करायला दिल्याचं आपल्या सर्वांच्या लक्षात आहेच. २००७ मध्ये तो ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. गांगुलीनं ११३ कसोटीत ४१.१७च्या सरासरीनं ७२१२ धावा केल्या. त्याचबरोबर ३११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११३६३ धावा केल्या आहेत. त्यानं कसोटीत १६ आणि एकदिवसीय सामन्यात २२ शतकं ठोकली आहेत.

Leave a comment