Virat Kohli On Rafael Nadal And Roger Federer : दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररनं शेवटचा सामना गमावल्यानंतर या खेळाला अलविदा केला आहे. या स्पर्धेत फेडरर टीम युरोपमध्ये होता जिथे त्याला राफेल नदालची साथ होती. हा संघ शुक्रवार, २३ सप्टेंबर रोजी लेव्हर कप २०२२ दुहेरी सामन्यात टीम वर्ल्डच्या जॅक सॉक आणि फ्रान्सिस टियाफो यांच्याकडून पराभूत झाला. त्यांनी सेंटर कोर्टवर हा सामना ६-४, ६-७ (२-७), ९-११ असा गमावला. यामुळे फेडरर थोडा निराश झाला. लेव्हर चषक सुरू होण्यापूर्वी, सर्वांच्या नजरा फेडररवर होत्या आणि त्याने खचाखच भरलेल्या स्टेडियमसमोर खेळाला अलविदा केला.
फेडररच्या निवृत्तीनंतर नदाललाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. दोन्ही खेळाडू खूप भावूक झाले होते. दोघेही एकाच बेंचवर बसून रडताना दिसले. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीही हे फोटो पाहून स्वत:ला थांबवू शकला नाही. यातील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा – VIDEO : तो रडला, आपणही रडलो..! टेनिस सम्राट रॉजर फेडररचं वादळ अखेर थंडावलं
काय म्हणाला विराट?
विराट फोटो शेअर करत म्हणाला, ”प्रतिस्पर्ध्यांना एकमेकांबद्दल असं वाटू शकतं, असा विचारही कोणी केला नसेल. हा माझ्यासाठी आत्तापर्यंतचा सर्वात सुंदर क्री़डा फोटो आहे. जेव्हा तुमचे साथीदार तुमच्यासाठी रडतात, तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही तुमच्या देवानं दिलेल्या प्रतिभेनं काय करू शकलात. या दोघांसाठी खूप आदर.”
Who thought rivals can feel like this towards each other. That’s the beauty of sport. This is the most beautiful sporting picture ever for me🙌❤️🫶🏼. When your companions cry for you, you know why you’ve been able to do with your god given talent.Nothing but respect for these 2. pic.twitter.com/X2VRbaP0A0
— Virat Kohli (@imVkohli) September 24, 2022
फेडररला अव्वल दर्जाच्या टेनिसमध्ये प्रवेश करून २० वर्षांहून अधिक काळ लोटला असून त्यानं चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. फेडरर आणि नदालनं सामना गमावला, पण कोर्टातून दोघांना टाळ्या मिळाल्या. दरम्यान, सामन्यानंतरच्या मुलाखतीदरम्यान फेडररला अश्रू अनावर झाले. फेडररचं बोलणे ऐकून नदाललाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. दोघेही एकमेकांच्या शेजारी बसून रडताना दिसले.