PAK vs ENG Final : इंग्लंड वर्ल्ड चॅम्पियन..! थरारक मॅचमध्ये पाकिस्तानचं स्वप्न भंगवलं

WhatsApp Group

T20 World Cup 2022 PAK vs ENG Final : साडेऐंशी हजार प्रेक्षकांसमोर रंगलेल्या टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला रोमहर्षक पद्धतीने मात दिली. अटीतटीच्या लढतीत इंग्लंडने पाकिस्तानला ६ गड्यांनी मात दिली आणि वर्ल्डकपवर नाव कोरले. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने पुन्हा एकदा मोठा खेळाडू असल्याचे सिद्ध केले. त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५२ धावांची खेळी केली. पाकिस्तानने दिलेले १३८ धावांचे आव्हान इंग्लंडने १९व्या षटकात पूर्ण केले.

इंग्लंडचा डाव

पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने अॅलेक्स हेल्सचा (१) त्रिफळा उद्ध्वस्त केला. कप्तान जोस बटलरने ३ चौकार आणि एका षटकारासह २६ धावा केल्या. पाकिस्तानने फिलीप सॉल्ट (१०), हॅरी ब्रुक (२०) यांच्या विकेट काढत दबाव निर्माण केला. पण बेन स्टोक्सने धावसंख्येचा वेग कमी पडू शकला नाही.  त्याने नाबाद आणि मॅचविनिंग खेळी केली. मोईन अलीने १९ धावा काढत महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्टोक्सने ५ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावा केल्या.

पाकिस्तानचा डाव

या सामन्यात इंग्लंडचा कप्तान जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या चांगल्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.  बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना चांगली सुरुवात करता आली नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करनने रिझवानला (१५) स्वस्तात बाद केले. त्यानंतर बाबर आझम (३२) आणि शान मसूद (३८) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना मोहम्मद हॅरिस (८), इफ्तिकार अहमद (०) यांची साथ लाभली नाही. इंग्लंडसाठी करनसोबत आदिल रशीदने सुंदर गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजांना जखडून ठेवले. पाकिस्तानने २० षटकात ८ बाद १३७ धावा केल्या. इंग्लंडकडून करनने ३ तर रशीद आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

हेही वाचा – ‘सी कॅडेट्स’ना राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून कौतुकाची थाप

दोन्ही संघांची Playing 11

इंग्लंड – जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, ख्रिस जॉर्डन.

पाकिस्तान – मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद हॅरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रौफ.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment