T20 World Cup 2022 IND vs ENG Semifinal : टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. आता उपांत्य फेरी आणि अंतिम सामने होणार आहेत. ९ नोव्हेंबर रोजी पहिल्या उपांत्य फेरीत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) संघ सिडनी येथे आमनेसामने येतील. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना १० नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये इंग्लंडशी होणार आहे. यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला सुपर-१२ च्या पुढे प्रगती करता आली नाही. आयसीसीने स्पर्धेच्या बाद फेरीचे नियम जारी केले आहेत. अशा परिस्थितीत पावसामुळे उपांत्य फेरीचा सामना झाला नाही तर त्याचा फायदा कोणत्या संघाला होईल, हे जाणून घ्या.
आयसीसीने उपांत्य फेरी आणि अंतिम दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला आहे. पहिला उपांत्य सामना ९ नोव्हेंबरला होणार आहे. पावसामुळे खेळ थांबला तर दुसऱ्या दिवशी जिथे थांबला होता तिथूनच सामना सुरू होईल. उदाहरणार्थ, जर एखाद्या संघाने पहिल्या दिवशी ७ षटकांत २ गडी गमावून ५० धावा केल्या असतील तर दुसऱ्या दिवशी येथून सामना सुरू होईल. पावसामुळे दुसऱ्या दिवशीही खेळ पूर्ण होऊ शकला नाही, तर गुणतालिकेत अव्वल संघ अंतिम फेरीत पोहोचेल. अशा स्थितीत भारत आणि न्यूझीलंडला फायदा होणार आहे. न्यूझीलंड संघ गट-१ मध्ये ७ गुणांसह अव्वल तर भारतीय संघ ८ गुणांसह गट-२ मध्ये अव्वल स्थानावर आहे.
हेही वाचा – Horoscope Today : आज चंद्रग्रहण..! जाणून घ्या तुमचा संपूर्ण दिवस कसा जाईल
नियमानुसार, गट फेरीतील सामन्याच्या निकालासाठी दोन्ही संघांनी किमान ५-५ षटकांची फलंदाजी करणे आवश्यक होते. पण बाद फेरीतही त्यात बदल झाला आहे. आता दोन्ही संघांना किमान १०-१० षटके खेळावी लागणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. पावसामुळे फायनल झाली नाही, तर एखादा संघ विजेता ठरणार नाही. आयसीसीनुसार, त्यानंतर संयुक्त विजेता घोषित केला जाईल. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात कधीही संयुक्त विजेता झालेला नाही.
Touchdown Adelaide 📍#TeamIndia | #T20WorldCup pic.twitter.com/absGUDySIK
— BCCI (@BCCI) November 7, 2022
चॅम्पियनला मिळणार ‘इतके’ कोटी!
टी-२० विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम ४५ कोटी आहे. विजेत्या संघाला १३ कोटी तर उपविजेत्या संघाला ६.५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला ३.२६ कोटी रुपये तर सुपर-१२ फेरीतून बाहेर पडणाऱ्या संघाला ५७ लाख रुपये मिळतील. यावेळी स्पर्धेत अनेक मोठे अपसेट पाहायला मिळाले. दोन वेळा टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावणाऱ्या वेस्ट इंडिजचा संघ सुपर-१२ फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही.