

T20 World Cup 2022 BAN vs ZIM : आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारी घटना घडत आहेत. जवळपास प्रत्येक सामन्यात काही ना काही ड्रामा होत असतो. असाच काहीसा प्रकार रविवारी बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात घडला. शेवटच्या षटकात पूर्ण नाट्य पाहायला मिळाले आणि सामना संपल्यानंतर जेव्हा खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते, तेव्हा तिसऱ्या पंचाने शेवटचा चेंडू नो बॉ़ल म्हणून घोषित करून पुन्हा सर्वांना मैदानात उतरण्याचा आदेश दिला.
बांगलादेशचा विजय
झिम्बाब्वेविरुद्ध बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या १० धावांच्या स्कोअरवर संघाला पहिला धक्का सौम्या सरकारच्या रूपाने बसला. यानंतरही संघाला ठराविक अंतराने धक्के बसत राहिले पण नजमुल हुसेनने एक टोक राखले आणि ५५ चेंडूत ७१ धावांच्या खेळीने संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ ८ बाद १४७ धावाच करू शकला. बांगलादेशने ३ धावांनी विजय मिळवत सुटकेचा नि:श्वास सोडला.
हेही वाचा – “ही वेळसुद्धा निघून जाईल…” अभिनेत्री समंथाला झालाय ‘गंभीर’ आजार
नक्की काय घडले?
२०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर असे काही घडले ज्यामुळे दोन्ही देशांच्या चाहत्यांची धडधड वाढली. झिम्बाब्वेला बांगलादेशविरुद्ध शेवटच्या ६ चेंडूत १६ धावांची गरज होती पण संघाला केवळ १२ धावाच करता आल्या. शेवटच्या चेंडूवर मुजरबानीला यष्टीरक्षक नुरुलने यष्टिचित केले आणि सामना संपत असल्याचे लक्षात घेऊन दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करू लागले. तिसऱ्या पंचाने हा चेंडू तपासला आणि बांगलादेशच्या यष्टीरक्षकाने चूक केल्याचे आढळले. स्टंपच्या पुढच्या भागातून चेंडू पकडत असल्याचे समोर आले. आयसीसीच्या नियमांनुसार, कोणताही यष्टीरक्षक विकेटच्या मागून चेंडू पकडू शकतो आणि जर त्याने विकेटसमोर चेंडू पकडला तर त्याला नो बॉल म्हटले जाईल. या कारणामुळे सामना पुन्हा सुरू करण्यात आला आणि तो शेवटचा चेंडू पुन्हा टाकण्यात आला. हा फ्री हिट बांगलादेशला महागात पडला असता पण मोसद्दिकने एकही धाव न देता संघाला वाचवले.