Shahid Afridi on Virat Kohli : आशिया चषक २०२२ या आठवड्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. दुबईमध्ये रविवारी (२८ ऑगस्ट) होणाऱ्या सामन्याची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत, ज्यामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असतील. गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषक सामन्यानंतर दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. याच मैदानावर गेल्या वेळी भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या स्पर्धेत सर्वांच्या नजरा विराट कोहलीकडे असतील, कारण तो महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा मैदानात उतरणार आहे. यासोबतच विराटच्या फॉर्मचीही जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनंही विराटचा फॉर्म आणि त्याच्या भविष्याबाबत मत व्यक्त केलं आहे.
विराट ब्रेकवर..
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली अखेरचा इंग्लंड दौऱ्यात सहभागी झाला होता, त्यानंतर तो मैदानापासून दूर होता. यासोबतच तो बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममध्येही खेळत आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोहलीनं निवड समितीला विनंती केली होती की वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याचा विचार करू नये. वेस्ट इंडिजमधील एकदिवसीय मालिकेसाठी इतर अनेक वरिष्ठांनाही विश्रांती देण्यात आली होती, परंतु ते पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी परतले होते. मात्र, कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या दोघांनाही संपूर्ण मालिकेसाठी वगळण्यात आलं.
हेही वाचा – वर्ल्ड चॅम्पियनला ६ महिन्यात तीनदा चारली धूळ..! भारताच्या १७ वर्षीय प्रज्ञानंदचा पराक्रम
आपल्या फॉर्ममधील घसरणीवर प्रश्नचिन्ह असलेल्या विराटलला रविवारी पाकिस्तानविरुद्ध नव्यानं सुरुवात करायची आहे. दुबईत त्यानं शेवटच्या वेळी पाकिस्तानविरुद्ध खेळताना ४९ चेंडूत ५७ धावा केल्या होत्या. मात्र, या सामन्यात बाबरसेनेकडून भारताला १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा पहिलाच पराभव होता.
आफ्रिदी काय म्हणाला?
ट्विटरवर प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान एका चाहत्यानं आफ्रिदीला विराट कोहलीच्या भवितव्याबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं उत्तर दिलं, “ते विराटच्या स्वत: च्या हातात आहे.” दुसर्या ट्वीटमध्ये चाहत्यानं सांगितलं की, विराट कोहलीला शतक झळकावायला १००० दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. यावर आफ्रिदी म्हणाला, “मोठे खेळाडू फक्त कठीण काळात ओळखले जातात.”
Bare players ka mushkil waqt me hi pata chalta hai
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) August 21, 2022
दरम्यान, स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांना मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे भारताला जसप्रीत बुमराहच्या रूपानं प्रमुख वेगवान गोलंदाजाची उणीव भासणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघही आपला वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीशिवाय या स्पर्धेत खेळणार आहे. शाहीन शाह आफ्रिदीला गॉल येथे श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत गुडघ्याला दुखापत झाली होती आणि ऑस्ट्रेलियात आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी तंदुरुस्ती परत मिळविण्यासाठी तो रिहॅबमधून जाणार असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सांगितलं आहे.