Sanju Samson On Ireland Cricket Offer : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला सतत खेळण्याची संधी मिळत नाहीये. संजू सॅमसनने २०१५ मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तरीही तो एकूण २७ सामने खेळू शकला आहे. सतत संघातून वगळल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयलाही टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयर्लंड क्रिकेट बोर्डाने सॅमसनला आपल्या संघाकडून खेळण्याची ऑफर दिली आहे.
संजूने दिले ‘असे’ उत्तर
इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, आयर्लंड क्रिकेट बोर्डाने संजू सॅमसनला आश्वासन दिले आहे की जर तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी आपल्या देशात आला तर तो सर्व सामन्यांमध्ये खेळेल. सॅमसनने आयरिश क्रिकेट बोर्डाची ऑफर नाकारली. तो म्हणाला, ”आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर कोणत्याही देशाकडून खेळण्याचा विचार करणार नाही कारण मला भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे.”
आयरिश क्रिकेट बोर्ड (क्रिकेट आयर्लंड) अशा खेळाडूच्या शोधात आहे जो उत्कृष्ट फलंदाजीसह कर्णधार करू शकेल. संजू सॅमसनने ही ऑफर स्वीकारली असती तर त्याला भारतीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीगला अलविदा म्हणावे लागले असते. भारतीय अंडर-१९ संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदनेही असाच मार्ग अवलंबला आणि आता तो अमेरिकेत क्रिकेट खेळत आहे.
हेही वाचा – Chanakya Niti : ‘या’ आहेत स्त्री-पुरुषांच्या घाणेरड्या सवयी, ज्यामुळं आयुष्य होतं उध्वस्त!
Sanju Samson has not been getting enough chances in Team India 🤯#CricketTwitter #teamindia pic.twitter.com/VAAQzoSif2
— Sportskeeda (@Sportskeeda) December 11, 2022
ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक आणि आशिया कप २०२२ साठी भारतीय संघात संजू सॅमसनची निवड झाली नाही. बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सॅमसनही भारतीय संघाचा भाग नव्हता. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सॅमसनचा संघात निश्चितपणे समावेश करण्यात आला असला तरी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
यावर्षी ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत संजू सॅमसन चांगलाच दिसला. सॅमसनने पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ८६ धावा करत भारताला जवळपास विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे नाबाद ३० आणि २ धावा केल्या. ती मालिका २-१ ने जिंकण्यात भारतीय संघाला यश आले.
संजू सॅमसनचा आंतरराष्ट्रीय विक्रम
२८ वर्षीय संजू सॅमसनने आतापर्यंत भारतासाठी १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २१.१४च्या सरासरीने आणि २९६ धावा केल्या आहेत. संजूने केवळ ११ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या ६६ च्या सरासरीने ३३० धावा आहेत. ऋषभ पंतसारख्या खेळाडूच्या तुलनेत संजू सॅमसनला भारताकडून खेळण्याच्या फार कमी संधी मिळाल्या आहेत.