Sachin Tendulkar On Glenn Maxwell In Marathi : करो वा मरो अशा परिस्थितीत खेळलेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या नाबाद 201 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा (AUS vs AFG World Cup 2023) 3 गडी राखून पराभव केला आणि वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. एकवेळ ऑस्ट्रेलियाने 91 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या. असे असतानाही मॅक्सवेलने हार न मानता एकट्याने ऑस्ट्रेलियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने 128 चेंडूत 21 चौकार आणि 10 षटकारांसह नाबाद 201 धावा केल्या. त्याची ही अविश्वसनीय खेळी पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्याचे कौतुक केले आहे.
सचिनने मॅक्सवेलच्या वादळी खेळीनंतर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने ही आयुष्यातील आपण पाहिलेली सर्वोत्तम वनडे खेळी असल्याचे म्हटले आहे. सचिनने अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झादरानचेही कौतुक केले. झादरानने या सामन्यात शतकी खेळी केली.
ऑस्ट्रेलियाचा 9 सामन्यांमधला हा सहावा विजय असून त्याचे 12 गुण झाले आहेत. अफगाणिस्तानच्या 292 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 46.5 षटकात 7 गडी गमावून 293 धावा केल्या. पॅट कमिन्सने 68 चेंडूत नाबाद 12 धावा केल्या. मॅक्सवेलला त्याच्या झंझावाती खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
अफगाणिस्तानकडून मोठी धावसंख्या
अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 291 धावा केल्या. सलामीवीर बॅटर इब्राहिम झादरानने आपल्या देशासाठी वर्ल्डकपमध्ये पहिलेवहिले शतक साजरे केले. रहमानुल्लाह गुरबाझ आणि इब्राहिम झादरानने पहिल्या विकेटसाठी 38 धावा केल्या. जोश हेझलवूडला मोठा फटका खेळण्याच्या नादात गुरबाझ वैयक्तिक 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर रहमत शाहने झादरानला साथ दिली. रहमत (30) बाद झाल्यावर कप्तान हाश्मतुल्लाह शाहिदीने (26) थोडा वेळ किल्ला लढवला. अफगाणिस्तानच्या प्रत्येक बॅटरने आपली जबाबदारी ओळखून धावा जमवल्या. मोहम्मद नबी (12) बाद झाल्यावर राशिद खानने जोरकस फटकेबाजी केली. त्याने 18 बॉलमध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 35 धावा केल्या. झादरानने नाबाद 129 धावांची (8 चौकार आणि 3 षटकार) जबरदस्त इनिंग खेळली. अफगाणिस्तानने 50 षटकात 5 बाद 291 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवूडने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तानची ही वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठी धावसंख्या ठरली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!