VIDEO : “….तेव्हा मी रडत रडत ग्राऊंडच्या बाहेर गेलो”, सचिन तेंडुलकरनं सांगितली ‘ती’ घटना!

WhatsApp Group

Sachin Tendulkar Cried : जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी खेळपट्टीवर असे काही क्षण आले आहेत ज्यामुळं तो भावूक झाला होता. २०११चा एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतरही सचिन भावूक झाला होता. हा त्याचा शेवटचा विश्वचषक होता. मास्टर ब्लास्टरनं जवळपास २४ वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा केली आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले, जे आता मोडणं फार कठीण आहे. तो आपले अनुभवही चाहत्यांसोबत शेअर करत असतो, जे लोकही आवडीनं ऐकतात.

सचिन का रडला होता?

असाच एक किस्सा सचिननं सोशल मीडियावर शेअर केला आहे. नुकताच त्यानं त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला असून क्रिकेटशी संबंधित त्याच्या आठवणी चाहत्यांशी शेअर केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये तो एका मैदानाची गोष्ट सांगत आहे. हे मैदान पीवायसी क्लबचे असून तिथं सचिन पहिल्यांदा क्रिकेट खेळला होता.

हेही वाचा – शेवटी विराट कोहलीनं केलं कबूल! म्हणाला, “आपल्याच माणसांनी भरलेल्या खोलीत मला…”

सचिन या व्हिडिओमध्ये म्हणतो, ”मी पीवायसी क्लबच्या मैदानात उभा आहे. तिथं मी १९८६ मध्ये माझा पहिला अंडर-१५ सामना खेळला. त्या सामन्यात मी नॉन स्ट्रायकर एंडवर उभा होतो. माझ्याच शाळेतील मित्र राहुल गणपुले हा स्ट्राइकवर उभा होता. तो ऑफमध्ये शॉट घेतो आणि धावतो. तिसरी धाव घेण्यासाठी तो माझ्यावर दबाव आणतो. मला त्याची वेगवान धावण्याची क्षमता माहीत होती, पण पुढं धावण्याचे धाडस माझ्यात नव्हते. त्याच्या सांगण्यावरून मी धावलो, पण धावबाद झालो.”

सचिन म्हणाला, ”मी आऊट झाल्यावर रडायला लागलो आणि रडत रडत खेळपट्टीवरून पॅव्हेलियनमध्ये गेलो. यानंतर काही वरिष्ठ खेळाडू आणि मुंबई संघाचे व्यवस्थापक अब्दुल इस्माईल यांनी मला समजावून सांगितलं. त्यानं मला सांगितलं, की मला अजून सामने खेळायचे आहेत. मी त्या सामन्यांमध्ये धावा करू शकतो. त्या लोकांकडून शिकून मी पुढे गेलो आणि पुढे मी खूप धावा केल्या. आता मी ३५ वर्षांनी या मैदानावर परतलो आहे आणि हे मैदान पाहून भावूक झालो.”

हेही वाचा – OMG..! चहल आणि धनश्री वेगळे होतायत? दोघांनी केलंय ‘असं’ काही की चर्चाच रंगतेय!

सचिनची कारकीर्द

सचिननं आपल्या कारकिर्दीत २०० कसोटी, ४६३ एकदिवसीय आणि एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यानं कसोटीत ५३.७९ च्या सरासरीने १५,९२१ धावा, एकदिवसीय सामन्यात ४४.८३च्या सरासरीनं १८४२६ धावा आणि एका टी-२० सामन्यामध्ये १० धावा केल्या. याशिवाय सचिननं कसोटीत ४६, एकदिवसीय सामन्यात १५४ विकेट्स घेतल्या आहेत. भारतासाठी एकमेव टी-२० मध्ये त्यानं एक विकेटही घेतली होती. याशिवाय सचिननं ७८ आयपीएल सामनेही खेळले, ज्यात त्यानं ११९.८२च्या स्ट्राइक रेटने २३३४ धावा केल्या. सचिनच्या नावावर कसोटीत ५१ शतकं आणि ६८ अर्धशतकं आहेत. त्याचबरोबर सचिनच्या नावावर वनडेमध्ये ४९ शतके आणि ९६ अर्धशतके आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment