Ranji Trophy 2022 Final : एका मुंबईकर माणसानं आख्ख्या मुंबई संघाचं स्वप्न धुळीस मिळवलं!

WhatsApp Group

मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदेचा ‘इक्बाल’ चित्रपट पाहिला असेल, तर शेवटी तो मुंबईच्या कमल नावाच्या बॅट्समनला ‘चक्रव्यूह’ पद्धतीनं आऊट करतो आणि आपल्या संघाला पहिलंवहिलं रणजी जेतेपद मिळवून देतो. ही ‘चक्रव्यूह’ रणनीती श्रेयसचे कोच नसरुद्दीन शाह यांची असते. पण जेव्हा इक्बाल या रणनीतीचा वापर स्वत: हून करायला जातो आणि हा प्रकार ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या नसिरुद्दीन शाह यांच्या ध्यानात येतो, तेव्हा त्यांच्या तोंडून एक डायलॉग बाहेर पडतो, ‘यह तो साला जिनियस है!’ यंदाच्या रणजी ट्रॉफीवर (Ranji Trophy 2022 Final) पहिल्यांदाच नाव कोरलेल्या मध्य प्रदेश संघाचे कोच चंद्रकांत पंडित यांनाही हा डायलॉग लागू होतो.

२३ वर्षांपूर्वी अपूर्ण राहिलेलं स्वप्न मध्य प्रदेशच्या क्रिकेट संघानं आता पूर्ण केलंय. फायनलमध्ये मध्य प्रदेशनं जायंट मुंबईला हरवलं आणि त्यांचं ४२ वेळा ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्नही धुळीस मिळवलं. सामन्यात मुंबईच्या ३७४ धावांच्या प्रत्युत्तरात मध्य प्रदेशनं पहिल्या डावात ५३६ धावा केल्या. मध्य प्रदेशनं पहिल्या डावाच्या जोरावर १६२ धावांची आघाडी घेतली. मध्य प्रदेशचा विजेतेपदात सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचा. ज्या संघाला बाद फेरी गाठण्यासाठी कठोर कष्ट घ्यावे लागत होते, त्याच संघाला पंडित यांनी चॅम्पियन बनवलंय.

कोण आहेत चंद्रकांत पंडित?

चंद्रकांत पंडित यांनी फक्त दोन वर्षात मध्य प्रदेशला रणजी विजेता म्हणून मान मिळवून दिलाय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चंद्रकांत पंडित यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. ६० वर्षीय पंडित यांनी भारतासाठी ५ कसोटी आणि ३६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. त्यांनी १३८ सामन्यांमध्ये २२ शतके आणि ४२ अर्धशतकांच्या मदतीने आठ हजारहून अधिक धावा केल्या आहेत.

प्रशिक्षक म्हणूनही त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. चंद्रकांत पंडित यांनी ३ वर्षांपूर्वी देशांतर्गत क्रिकेट संघात फारसा बलवान न मानल्या जाणाऱ्या विदर्भाला सलग दोन हंगामात (२०१७-१८ आणि २०१८-१९) रणजी चॅम्पियन बनवलं. याआधी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या देखरेखीखाली मुंबईनं रणजी करंडकही जिंकला होता. म्हणजेच ६ वर्षांच्या आत ते तीन वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या संघाचा भाग झाले आहेत.

पंडित यांनी काही वर्षे मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेटही खेळलं. त्यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशचा संघ १९९९ मध्ये पहिल्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, कर्नाटकने त्यांना हरवून स्वप्नभंगल केला होता. त्यानंतर पंडित यांनी कोचिंगमध्ये हात आजमावण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या देखरेखीखाली मुंबईने २००३ आणि २००४ मध्ये सलग दोन वर्षे रणजी करंडक जिंकला.

कडक शिस्तीचा मास्तर!

एक शिस्तप्रिय, कठोर कोच म्हणून पंडित ओळखले जातात. कर्णधार किंवा कोणताही खेळाडू त्यांनी संघासाठी तयार केलेल्या रणनीतीमध्ये फारसा हस्तक्षेप करत नाहीत. शिस्त हा त्याच्या कोचिंगचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि त्यात ते तडजोड करत नाहीत. पंडित विदर्भाचे प्रशिक्षक असताना त्यांनी कर्नाटकविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान संघाच्या खेळाडूंचे फोन आपल्याकडे ठेवले होते, जेणेकरून खेळाडूंचं लक्ष फक्त सामन्याकडं असेल. आज याच शिस्तीमुळं पंडित आपल्या क्षेत्रात मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचले आहेत.

Leave a comment