अफगाणिस्तानने रचला इतिहास, वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला चारली धूळ!

WhatsApp Group

PAK vs AFG World Cup 2023 In Marathi : भारतात सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये खळबळ उडाली आहे. अफगाणिस्तानने इतिहास रचत पाकिस्तानला 8 गड्यांनी धूळ चारली. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी घेतली. कर्णधार बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीकच्या अर्धशतकांच्या जोरावर 7 विकेट गमावत पाकिस्तानने 282 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या नूर अहमदने सर्वाधिक तीन बळी घेतले. प्रत्त्युत्तरात अफगाणिस्तानकडून सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झाद्रान आणि रहमत शाह यांनी जबरदस्त अर्धशतके ठोकत पाकिस्तानला रडवले आणि 49व्या षटकात रेकॉर्ड विजयाची नोंद केली.

पाकिस्तानचा डाव

वर्ल्डकपमध्ये चांगल्या फॉर्मात असलेल्या अब्दुल्ला शफीकने इमाम उल हकसोबत पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. शफीकने 5 चौकार आणि 2 षटकारासह 58 धावांची खेळी केली. इमाम 17 धावा काढून बाद झाला. विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या नूर अहमदने शफीकला बाद केले. शफीकनंतर बाबर आझमने डाव पुढे नेला. बाबरने 4 चौकार आणि एका षटकारासह 74 धावांची खेळी केली. नूरने त्यालाही तंबूचा रस्ता दाखवला. पाकिस्तानचा इनफॉर्म बॅटर मोहम्मद रिझवानही (8) नूरचा बळी ठरला. मधल्या फळीतील शादाब खान आणि इफ्तिकार अहमद यांनी पाकिस्तानसाठी प्रत्येकी 40 धावा जोडल्या. या दोघांना नवीन उल हकने बाद केले. पाकिस्तानने 50 षटकात 7 बाद 282 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून नूर अहमदने 49 धावांत 3 बळी घेतले. नवीनला 2 तर मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाई यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

अफगाणिस्तानचा डाव

पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान यांनी जबरदस्त सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 130 धावा केल्या. शाहिन आफ्रिदीने गुरबाजला बाद करत ही जोडी फोडली. गुरबाजने 9 चौकार आणि एका षटकारासह 65 धावा केल्या. तर झाद्रानने 10 चौकार आणि एका षटकारासह 87 धावा केल्या. हसन अलीने झाद्रानला यष्टीपाठी झेलबाद केले. हे दोघे बाद झाल्यावर रहमत शाह आणि कप्तान हशमतुल्ला शाहिदी यांनी अर्धशतकी भागीदारी केली. अफगाणिस्तानच्या बॅटिंगपुढे पाकिस्तानचे काही चालले नाही. एकेरी, दुहेरी धावा, दबाव हटवण्यासाठी एखादा चौकार असे मिश्रण करत अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी 96 धावांची विजयी भागीदारी रचली. रहमतने 5 चौकार आणि 2 षटकारासह नाबाद 77 धावा केल्या. तर कप्तान शाहिदीने 4 चौकारांसह नाबाद 48 धावांची संयमी खेळी केली.

हेही वाचा – इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये महाभरती, लगेच करा अर्ज!

दोन्ही संघांची Playing 11 (PAK vs AFG)

अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झाद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अली खिल (यष्टीरक्षक), मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, नूर अहमद.

पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, शादाब खान, इफ्तिखार अहमद, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment