पुण्यात न्यूझीलंडचा करेक्ट कार्यक्रम, दक्षिण आफ्रिकेचा ‘तगडा’ विजय!

WhatsApp Group

NZ vs SA World Cup 2023 In Marathi : दक्षिण आफ्रिकाने वर्ल्डकपमध्ये विजयी षटकार लगावला आहे. पुण्यात रंगलेल्या सामन्यात आफ्रिकाने न्यूझीलंडला 190 धावांनी हरवले आणि गुणतालिकेत चांगल्या रन रेटसह आणि 12 गुणांसह पहिल्या स्थानी झेप घेतली. या एकतर्फी विजयात चमकले क्विंटन डी कॉक आणि रासी वॅन डर डुसेन. या दोघांनी शतके ठोकत न्यूझीलंडसमोर 357 धावांचा डोंगर उभा केला. डी कॉकने या वर्ल्डकपमध्ये आपले चौथे शतक साजरे केले. न्यूझीलंडला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 167 धावांत ऑलआऊट झाला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे पाकिस्तानच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. न्यूझीलंडने पुढील दोन्ही सामने गमावले तर गुणतालिकेत रंगत निर्माण होऊ शकते.

दक्षिण आफ्रिकेचा डाव

कप्तान टेम्बा बावुमा आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या गड्यासाठी 38 धावा फलकावर लावल्या. ट्रेंट बोल्टने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. बावुमाने 24 धावा केल्या. यानंतर डी कॉक आणि रासी वॅन डर डुसेन यांवी द्विशतकी भागीदारी रचली. डी कॉकने 10 चौकार आणि 5 षटकारांसह 114 धावांची खेळी केली. टीम साऊदीने त्याला झेलबाद केले. डुसेन आणि डेव्हिड मिलरने संघाला तीनशेपार पोहोचवले. डुसेनने 9 चौकार आणि 5 षटकारांसह 133 धावा केल्या. वेगवान गोलंदाज टीम साऊदीने त्याला बाद केले. त्यानंतर मिलरने आक्रमक फटकेबाजी करत 30 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह 53 धावा फटकावल्या. क्लासेन 15 आणि मार्कराम 6 धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेने 50 षटकात 4 बाद 357 धावा केल्या.

हेही वाचा – वर्ल्डकपदरम्यान ग्लेन मॅक्सवेलचा अपघात, ऑस्ट्रेलियाला तगडा धक्का!

न्यूझीलंडचा डाव

आफ्रिकेच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला (2) स्वस्तात गमावले. फॉर्मात असलेला रचिन रवींद्रही (9) लवकर तंबूत परतला. वेगवान गोलंदाज मार्को जानसेन याने दोघांना बाद केले. विल यंग (33), डॅरिल मिचेल (24) यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. आफ्रिकाच्या कगिसो रबाडा, केशव महाराज यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना वेसण घातले. अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने एक बाजू शेवटपर्यंत लढवली, पण ती पुरेशी ठरली नाही. फिलिप्सने 4 चौकार आणि 4 षटकारांसह 60 धावांची खेळी केली. न्यूझीलंड 35.3 धावांत ऑलआऊट झाला. आफ्रिकाकडून केशव महाराजने सर्वाधिक 4, जानसेनने 3, कोट्झीने 2 विकेट्स काढल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment