अजित भालचंद्र आगरकर : जे तेंडुलकरला जमलं नाही, ते या पठ्ठ्याने केलंय!

WhatsApp Group

Ajit Agarkar : अजित भालचंद्र आगरकर, आता टीम इंडियाचा नवनियुक्त चीफ सिलेक्टर बनला आहे. आगरकर हा वनडे फॉरमॅटमधील स्पेशालिस्ट खेळाडू आहे. 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचाही तो भाग होता. त्याचबरोबर त्याने कसोटी क्रिकेटमध्येही अनेक संस्मरणीय कामगिरी केली आहे. आगरकरच्या नावावर असे अनेक विक्रम आहेत, जे आजही कायम आहेत. एक भारतीय फलंदाज म्हणून वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 धावा करण्याचा विक्रम आजही आगरकरच्या नावावर आहे.

पाहिले तर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विरोधाभास आहेत. त्याने लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी शतक झळकावले आहे, तर सलग शून्यावर बाद होण्याचा विश्वविक्रमही त्याच्या नावावर आहे. आगरकर हा कसोटी क्रिकेटच्या सलग पाच डावात 0 धावांवर बाद होण्याचा (बॉब हॉलंडसह) संयुक्त विक्रम आहे. आगरकर 1999-2000 दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग पाच कसोटी डावात शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

मुंबईच्या रणजी संघात चमकदार कामगिरी करून टीम इंडियात पोहोचलेल्या अजित आगरकरने वनडे क्रिकेटमध्ये शानदार सुरुवात केली होती. 1 एप्रिल 1998 रोजी, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोची येथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर तो जो काही एकदिवसीय सामना खेळायचा त्यामध्ये तो विकेट्स घेत धुमाकूळ घालत असे.

हेही वाचा – Horoscope Today: चंद्र आणि गुरुचा शुभ संयोग, ‘या’ राशींनी सावधान

यावेळी त्याने वनडेमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेतल्या होत्या. आगरकरने कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा तो मोठ्या शर्यतीचा घोडा आहे, असे सर्वांना वाटले. आगरकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर 13 सामन्यांमध्ये एकही सामना असा नाही ज्यामध्ये त्याला विकेट मिळाली नाही. आगरकरने केवळ 23 सामन्यात 50 बळी घेण्याचा विक्रम केला. 1998 मध्ये केलेला हा विक्रम श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने 2009 मध्ये मोडीत काढला होता.

2005-06 मध्ये अजित आगरकर टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा वेगवान गोलंदाज बनला. 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषक खेळण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात अजित आगरकरचाही समावेश होता, पण या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. याचा परिणाम अजितवरही झाला, त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले.

आगरकरमुळे भारताचा 20 वर्षानंतर मोठा पराक्रम

2003 मध्ये, भारताने 20 वर्षांनी ऑस्ट्रेलियात अॅडलेड कसोटी सामना जिंकला होता, त्यामुळे या कसोटीच्या विजयात आगरकरचे मोठे योगदान होते. पहिल्या डावात 556 धावांची डोंगराएवढी धावसंख्या करणारा ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात आगरकरच्या घातक गोलंदाजीपुढे अवघ्या 196 धावांत गारद झाला. आगरकरने 41 धावांत 6 बळी घेतले. टीम इंडियाने हा सामना जिंकला.

रणजीमधील अविस्मरणीय स्पेल

2010 मध्ये अजित आगरकरने कर्नाटकविरुद्धच्या रणजी ट्रॉफी फायनलमध्ये अविस्मरणीय गोलंदाजी केली होती. त्याने 81 धावांत 5 बळी घेतले. त्यामुळे 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकचा संघ चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर 331 धावांतच गारद झाला. आगरकरने 2012-13 हंगामात मुंबईचे नेतृत्व केले. मुंबईने 40वी रणजी ट्रॉफी जिंकली. यानंतर, त्याने पुढील देशांतर्गत हंगामापूर्वी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment