विक्रमी मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्रा ‘पाकिस्तानी’ मित्राशी काय बोलला? जाणून घ्या!

WhatsApp Group

मुंबई : ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रानं यूजीन, यूएसए येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. या खेळांच्या इतिहासातील भारताचे हे एकूण दुसरे आणि पहिलं रौप्यपदक आहे. भालाफेकमध्ये सुवर्णपदक ग्रेनेडाच्या विश्वविजेत्या अँडरसन पीटर्सनं पटकावलं. त्यानं अंतिम फेरीत एक-दोन नव्हे तर तीन वेळा ९० मीटरहून अधिक अंतरावर भाला फेकून सुवर्णपदकावर कब्जा केला. या मोसमात नीरज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्येही तो कायम ठेवला आहे, त्यानं भालाफेकमध्ये ८८.१३ मीटर अंतरावर रौप्यपदक जिंकले आहे.

नीरजशिवाय पाकिस्तानच्या अर्शद नदीमनंही भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याला पदक जिंकता आलं नाही. पण, आपल्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केलं. टोक्यो ऑलिम्पिकनंतर अर्शदचा हा पहिलीच मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. तरीही तो ८६.१६ मीटरवरून भालाफेक करून पाचव्या स्थानावर राहिला. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरणारा तो पहिला पाकिस्तानी खेळाडू आहे.

नीरज-अर्शदचा संवाद!

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीदरम्यान नदीमशी झालेल्या संभाषणाबद्दल नीरजला विचारलं असता, नीरज म्हणाला, “या कार्यक्रमादरम्यान मी नदीमला भेटू शकलो नाही. फायनलनंतर मी त्याला नक्कीच भेटलो आणि त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचं अभिनंदन केले. दुखापतीनंतरही ८६ मीटर अंतरावर भाला फेकणं ही खरोखरच उत्कृष्ट कामगिरी आहे. यापेक्षा चांगल्या पुनरागमनाची अपेक्षा करू शकत नाही.”

अर्शद नदीमची दुखापत..

अर्शद नदीम कोपराच्या दुखापतीनं जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. त्यामुळंच त्याला सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी तो म्हणाला होता, “मी सध्या विचार करत नाही आहे की लक्ष्य काय असू शकतं? माझ्या कोपराला दुखापत झाल्यामुळं सर्वोत्तम कामगिरी करणं हे माझे ध्येय आहे. आमच्यासोबत यूकेचे डॉ. अली बाजवा आहेत, त्यामुळे माझं लक्ष चांगले काम करण्यावर आहे. पदक जिंकणं हे निश्चितच माझ्या मनात आहे.”

नीरजचा विक्रम!

३९ वर्षीय जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचं भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. भारताला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. तब्बल १९ वर्षांनंतर या चॅम्पियनशिपमध्ये भारताला पदक मिळाले आहे. नीरजच्या आधी अंजू बॉबी जॉर्जनं २००३ मध्ये लांब उडीत कांस्यपदक जिंकलं होतं. या चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तसंच, या चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे.

Leave a comment