Yograj Singh On MS Dhoni : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीवर टीकास्त्र सोडले आहे. भारतासाठी सात सामने खेळलेल्या योगराज यांनी अनेक वेळा धोनीवर सार्वजनिक व्यासपीठावर टीका केली आहे आणि त्यांचा मुलगा युवराजची कारकीर्द उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. धोनीवर पुन्हा हल्लाबोल करत योगराज यांनी धोनीला आयुष्यात कधीही माफ करणार नसल्याचे म्हटले आहे. योगराज यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
एका यूट्यूब चॅनलवर बोलताना योगराज म्हणाले, ”मी एमएस धोनीला माफ करणार नाही. त्याने त्याचा चेहरा आरशात पाहावा. तो खूप मोठा क्रिकेटर आहे, पण त्याने माझ्या मुलाविरुद्ध काय केले हे आता समोर येत आहे. त्याला आयुष्यात मी कधीच माफ करणार नाही. मी आयुष्यात कधीच दोन गोष्टी केल्या नाहीत, पहिली, ज्याने माझ्यावर अन्याय केला असेल त्याला मी कधीच माफ केले नाही आणि दुसरी, मी आयुष्यात त्यांना कधीच मिठी मारली नाही, मग ते माझे कुटुंबीय असो किंवा माझी मुले.”
युवराज आणखी चार-पाच वर्षे देशासाठी खेळू शकला असता, असा दावाही त्यांनी केला. योगराज यांनी आपल्या मुलाला ‘भारतरत्न’ देण्याची मागणीही केली आहे. युवराज 2007 टी-20 विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक 2011 जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.
Yograj Singh about Ms dhoni and Kapil dev in his latest interview. pic.twitter.com/aLBS1PAzZ7
— mufaddla parody (@mufaddl_parody) September 1, 2024
66 वर्षीय योगराज यांनी धोनीवर थेट निशाणा साधण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी दावा केला होता की धोनीच्या चुकीच्या कृत्यांमुळे चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2024 हरली. धोनी युवराजचा मत्सर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. 43 वर्षीय धोनी अजूनही आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून सक्रिय आहे. धोनीचे चेन्नई सुपर किंग्जसोबतचे भवितव्य सध्या अनिश्चित आहे कारण तो पुढील वर्षी आयपीएलमध्ये भाग घेणार की नाही हे स्पष्ट नाही. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला होता की धोनीचे भविष्य इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार ठरवले जाईल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!