IPL 2024 CSK vs GT Sameer Rizvi : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा हिटर शिवम दुबे 19व्या षटकात बाद झाला. चेन्नईत सामना म्हटल्यावर सर्वांनी आता महेंद्रसिंह धोनी मैदानात येईल अशी अपेक्षा केली. पण समीर रिझवी मैदानात आला. गुजरातचा दिग्गज फिरकीपटू राशिद खान समीरला त्याच्या आयपीएल करियरचा पहिला चेंडू टाकला. समीरने कोणताही दबाव न घेता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला. समीरने या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरही लाँग ऑफला षटकार हाणला. हाणामारीच्या 20व्या षटकात समीर बाद झाला. त्याने 6 चेंडूत 14 धावा केल्या. आपणही काही कमी नाही, असे सांगत समीरने आयपीएल करियरची सुंदर सुरुवात केली.
भारतीय अनकॅप्ड फलंदाज समीर रिझवीचा जन्म 6 डिसेंबर 2003 रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात झाला. समीरचे वडील हसीन लोहिया हे प्रॉपर्टी डीलर असून आईचे नाव रुखसाना आहे. त्याच्या कुटुंबात त्याला एक मोठा भाऊ हसीन रिझवी आणि दोन बहिणी आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांनी समीरला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. समीर रिझवीचे मामा आणि प्रशिक्षक तनकीब अख्तर यांची क्रिकेट कारकीर्द घडवण्यात महत्त्वाची भूमिका आहे.
समीरने आपले प्राथमिक शिक्षण मेरठमधील एका खासगी शाळेतून पूर्ण केले. क्रिकेटवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याने फारसा अभ्यास केलेला नाही. वयाच्या 20 व्या वर्षी समीरने 10वीची परीक्षा दिली. त्याने लहान वयातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वयाच्या 11 व्या वर्षी, त्याने मेरठमधील गांधीबाग अकादमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली, जिथे त्याला त्याचे मामा तनकीब अख्तर यांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण देण्यात आले. समीरच्या मामाने त्याची क्रिकेट क्षमता ओळखली आणि त्याला खेळातील गोष्टी शिकवल्या. त्यांनीच समीरला क्रिकेटला गांभीर्याने घेण्याची प्रेरणा दिली. समीरचे अभ्यासातून लक्ष वळवण्यासाठी त्यांना समीरच्या वडिलांच्या रोषालाही सामोरे जावे लागले.
यामुळे तनकीब यांनी अनेक वर्षांपासून बहिणीच्या घरी जाणे बंद केले होते. मात्र, त्यांनी समीरचा सराव सुरूच ठेवला. समीरने लवकरच आपल्या फलंदाजीच्या प्रतिभेने सर्वांना प्रभावित केले. 16 वर्षांखालील स्तरावर समीर रिझवी सलामीवीर म्हणून फलंदाजी करायचा, पण फिरकी गोलंदाजीविरुद्ध त्याचा नैसर्गिक खेळ पाहून त्याच्या एका प्रशिक्षकाने त्याला मधल्या फळीत फलंदाजी करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने आपल्या पॉवर हिटिंग बॅटिंगने आपली छाप पाडली.
हेही वाचा – IPL 2024 CSK Vs GT : चेन्नईचे गुजरातला 207 धावांचे आव्हान, शिवम दुबेची स्फोटक खेळी!
त्याने अंडर-16 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आणि 7 सामन्यात 610 धावा केल्या. त्याची सातत्यपूर्ण फलंदाजी क्षमता आणि शॉट मारण्याची शैली लक्षात घेऊन सिलेक्टर्सनी त्याची भारताच्या अंडर-19 संघासाठी निवड केली.
वयाच्या 16 व्या वर्षी, समीरने 2019-20 रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले. 27 जानेवारी 2020 रोजी मध्य प्रदेश विरुद्धच्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यात समीर रिझवी काही विशेष करू शकला नाही. पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही, तर दुसऱ्या डावात तो केवळ 2 धावांवर बाद झाला. समीर रिझवीने 2021-22 विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशसाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. समीरने आतापर्यंत 11 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 29.28 च्या सरासरीने 205 धावा केल्या आहेत. समीरने 16 ऑक्टोबर 2022 रोजी मणिपूर विरुद्ध खेळून उत्तर प्रदेश संघासाठी टी20 मध्ये पदार्पण केले.
समीरची आक्रमक फलंदाजीची क्षमता पाहून त्याला पंजाब किंग्जसह तीन आयपीएल फ्रेंचायझींमध्ये चाचणी घेण्याची संधी मिळाली. पण यूपीच्या 23 वर्षांखालील संघासोबतच्या आधीच्या वचनबद्धतेमुळे त्याला चाचण्या सोडाव्या लागल्या. 23 वर्षांखालील क्रिकेटमध्ये आपल्या पहिल्या खेळात, समीरने राजस्थान विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 65 चेंडूत 91 धावा करून आपली प्रतिभा दाखवली. डिसेंबर 2023 मध्ये, समीरला चेन्नई सुपर किंग्जने 2024 आयपीएल लिलावात 8.40 कोटी रुपयांना विकत घेतले, त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा