IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या वर गेली RCB…! हैदराबादला हरवलं; विराटची ‘क्लासिक’ सेंच्युरी!

WhatsApp Group

IPL 2023 SRH vs RCB : आयपीएल 2023 चा 65 वा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हेनरिक क्लासेन आणि विराट कोहली अशी दोन शतके पाहायला मिळाली. क्लासेनचे शतक व्यर्थ गेले, पण विराटच्या शतकामुळे बंगळुरूने हा सामना 8 गड्यांनी जिंकला. या विजयामुळे बंगळुरूचे प्लेऑफमधील आव्हान चांगल्या गुणांसह जिवंत आहे.

या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने शतक झळकावले. हैदराबादकडून अभिषेक शर्मा (11) आणि राहुल त्रिपाठी (15) यांना फलंदाजीत चांगली सुरुवात करता आली नाही. कप्तान एडन मार्करमही (18) अपयशी ठरला. त्यानंतर हेनरिक क्लासेनने एकहाती किल्ला लढवला. त्याने 51 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह 104 धावांची खेळी केली. बंगळुरूकडून ब्रेसवेलने सर्वाधिक दोन बळी घेतले.

हेही वाचा – Personal Loan : सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज पाहिजे? ‘या’ 10 बँकांमध्ये मिळेल!

प्रत्युत्तरात बंगळुरूकडून विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी पॉवरप्लेमध्ये हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. विराट कोहली आणि कर्णधार डुप्लेसिस यांनी 172 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावर हे लक्ष्य सोपे झाले आणि आरसीबीने हा सामना 8 गडी राखून जिंकला. विराट कोहलीने 63 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांसह 100 धावा केल्या. तर फाफ डु प्लेसिसने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 71 धावांची खेळी केली. बंगळुरूने 20 षटकात 2 बाद 187 धावा करत सामना जिंकला. या विजयामुळे बंगळुरूचा संघ 14 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्स पाचव्या क्रमांकावर सरकली आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके

  • 6 – ख्रिस गेल
  • 6 – विराट कोहली
  • 5 – जोस बटलर

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment