IPL 2023 : आयपीएल 2023 च्या 58 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊ संघाने शेवटच्या षटकात 3 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. या मॅचमध्ये हैदराबादच्या प्रेक्षकांनी चुकीची गोष्ट केली. त्यांच्या एका कृत्यामुळे सामना थोडा वेळ थांबवावा लागला.
सनरायझर्स हैदराबाद संघ फलंदाजी करताना लखनऊसाठी आवेश खानने 19 वे षटक टाकले. त्यानंतर या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने एक फुल टॉस टाकला. चेंडू पाहिल्यानंतर लेग अंपायरने त्याला नो बॉल ठरवले. मात्र त्यानंतरच लखनऊ संघाने या चेंडूवर रिव्ह्यू घेतला. चेंडू हैदराबादचा फलंदाज अब्दुल समदच्या कमरेच्या अगदी वर गेल्याचेही रिव्ह्यूमध्ये स्पष्टपणे दिसून आले. मात्र तिसऱ्या पंचाने नो बॉल न देता लीगल डिलिव्हरी देऊन सर्वांनाच चकित केले.
हेही वाचा – Free Recharge : पंतप्रधान मोदींकडून भारतीयांना 239 रुपयांचा फ्री रिचार्ज? जाणून घ्या सत्य!
या निर्णयामुळे हैदराबादचे चाहते खूपच निराश झाले. यानंतर, मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ सुपर जायंट्सच्या डगआउटवर काहीतरी फेकण्यात आले. क्रिकबझच्या माहितीनुसार, लखनऊच्या डगआऊटच्या दिशेने नट बोल्ट फेकण्यात आले. सामना थांबला आणि दोन्ही मैदानी पंचही डगआऊटच्या दिशेने गेले. दरम्यान, लखनऊचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्स यांनी ट्विटरवर खुलासा केला की, हे नट डगआऊटवर फेकले नसून सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूंवर टाकले गेले. त्यांनी सांगितले की, लाँग ऑनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्रेरक मंकडच्या डोक्यावर लोकांनी नट आणि बोल्ट फेकले होते.
या प्रकरणामुळे सामन्यात मोठा गदारोळ झाला. या निर्णयामुळे सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू पूर्णपणे संतप्त झाले होते. क्रीजवर उभा असलेला हेनरिक क्लासेन मैदानावरील पंचांना सतत प्रश्न विचारत होता. तसे करणे योग्यही होते कारण चेंडू कंबरेच्या अगदी वर असल्याचे रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होते. हा गोंधळ डग आऊटपर्यंत पोहोचला आणि तिथेही हैदराबादच्या प्रशिक्षकाने मैदानावरील पंचांना प्रश्न विचारला.