IPL 2023 : सूर्या, इशानची तोडफोड बॅटिंग..! मुंबई इंडियन्सने सहज गाठलं 215 धावांचं लक्ष्य

WhatsApp Group

IPL 2023 PBKS vs MI : आयपीएल 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. मोहालीच्या स्टेडियमवर रंगलेल्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अफलातून फलंदाजीचा नजराणा पेश करत 6 गड्यांनी विजय मिळवला आणि वानखेडेवरील पराभवाचा बदला घेतला. सूर्यकुमार यादव आणि इशान किशनच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर मुंबईने 215 धावांचे आव्हान सहजरित्या पेलले. मुंबईचे आता 10 गुण झाले असून ते गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

पंजाबच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित शर्मा अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज ऋषी धवनने त्याला पहिल्याच षटकात शून्यावर बाद केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने चौकार षटकाराची आतषबाजी करत 116 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने 8 चौकार आणि 2 षटकारांसह 66 धावांची खेळी केली. तर इशानने 7 चौकार आणि 4 षटकारांसह 75 धावा काढल्या. तिलक वर्मा (26) आणि मागील सामन्यातील हिरो टिम डेव्हिड (19) यांनी 19व्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईने 18.5 षटकात 4 बाद 216 धावा केल्या.  पंजाबकडून नॅथन एलिसने 2 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – IPL 2023 : रोहित शर्मा ‘झिरो’वर OUT..! आयपीएलमध्ये बनवला ‘नवा’ रेकॉर्ड

पंजाबची अफलातून बॅटिंग

टॉस गमावलेल्या पंजाबने 20 षटकात 3 बाद 214 धावा केल्या. चांगल्या सुरुवातीनंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांनी मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. लिव्हिंगस्टोनने 42 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 82 तर जितेशने 27 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 49 धावांची खेळी केली. मुंबईकडून पीयुष चावलाने 2 विकेट्स घेतल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment