IPL 2023 : लिव्हिंगस्टोनचे 9 सिक्स, दिल्लीची घाणेरडी फिल्डींग, तरीही पंजाब हरली!

WhatsApp Group

IPL 2023 PBKS vs DC : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 15 धावांनी पराभव केला. लियाम लिव्हिंग्स्टोनने 94 धावांची स्फोटक खेळी खेळूनही पंजाबला जिंकता आले नाही. दिल्लीने दिलेल्या 214 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना पंजाबचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 198 धावाच करू शकला. या पराभवामुळे पंजाबचा प्लेऑफचा मार्गही अत्यंत खडतर झाला आहे.

लिव्हिंग्स्टोनची झंझावाती खेळी व्यर्थ

214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही आणि कर्णधार शिखर धवन खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. धवन बाद झाल्यानंतर प्रभसिमरन आणि अथर्व तायडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. प्रभसिमरन 22 धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला. अथर्व 55 धावा करून निवृत्त होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. लियाम लिव्हिंग्स्टोनने एका टोकाकडून कहर केला आणि मोसमातील दुसरे अर्धशतक मिळवले. मात्र, जितेश शर्मा, शाहरुख खान आणि सॅम करन यांना फलंदाजीत काही विशेष दाखवता आले नाही.

हेही वाचा – IPL 2023 : हवेत उडणाऱ्या शिखर धवनला बघायचंय? हा Video पाहाच!

शेवटच्या षटकातील थरार

शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी 33 धावांची गरज होती. पहिला चेंडू डॉट झाल्यानंतर लिव्हिंगस्टोनने दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. लिव्हिंगस्टनने चौथ्या चेंडूवर पुन्हा षटकार मारला आणि पंचांनी चेंडूला नो बॉल ठरवले. मात्र, शेवटच्या तीन चेंडूंवर लिव्हिंगस्टनला एकही धाव करता आली नाही आणि अखेरच्या चेंडूवर अक्षरच्या हाती झेल देत पॅव्हेलियनमध्ये परतला. लिव्हिंगस्टोनने 48 चेंडूत 94 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 9 षटकार ठोकले. दिल्लीकडून एनरिक नॉर्किया आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

दिल्लीची दमदार बॅटिंग!

डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ़ यांनी पहिल्या विकेटसाठी 94 धावांची दमदार भागीदारी रचली. पंजाबकडून सॅम करनला वॉर्नरच्या रुपात पहिले यश मिळाले. वॉर्नरने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 46 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या रायली रुसोने आक्रमक फटके खेळले. करनने अर्धशतक ठोकलेल्या पृथ्वीला बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. पृथ्वीने 7 चौकार आणि एका षटकारासह 54 धावा केल्या. 17व्या षटकात रुसोने आपले अर्धशतक ओलांडले. रुसोला फिल सॉ़ल्टनेही साथ दिली. त्याने 2 षटकारांसह नाबाद 22 धावा केल्या. रुसोने 37 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 82 धावा केल्या. दिल्लीने 20 षटकात 2 बाद 213 धावा केल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment