IPL 2023 : रिंकू सिंह पुन्हा हिरो..! शेवटच्या बॉलवर चौकार ठोकत KKR ला केलं विजयी

WhatsApp Group

IPL 2023 KKR vs PBKS : आयपीएल 2023 चा 53 व्या सामना सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात इडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात नितीश राणाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सने पंजाब किंग्जचा रंगतदार पद्धतीने आणि 5 विकेट्सने पराभव केला. पंजाबने कोलकाताला 20 षटकात 180 धावांचे आव्हान दिले होते. पण आंद्रे रसेल, रिंकू सिंहची तुफानी खेळी, नितीश राणाचे झुंजार अर्धशतक कोलकाताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे ठरले. या विजयासह कोलकाताने गुणतालिकेत 10 गुणांसह पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

नाणेफेक जिंकून पंजाबचा कप्तान शिखर धवनने प्रथम फलंदाजी घेतली. पंजाबने 20 षटकांत 7 गडी गमावून 179 धावा केल्या. शिखर धवनने अर्धशतकी खेळी खेळली. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने 3 आणि हर्षित राणाने 2 बळी घेतले. सुयश शर्मा आणि नितीश राणा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा – आपली मुंबई 500 वर्षानंतर कशी दिसेल? भविष्यातील चित्र पाहून थक्क व्हाल!

शेवटच्या षटकात कोलकाता विजयी

प्रत्युत्तरात कोलकाताकडून जेसन रॉयने (38) चांगली सुरुवात केली. त्यानंतर नितीश राणाने वेंकटेश अय्यरसोबत भागीदारी करत संघाला शतकापार पोहोचवले. राणाने 6 चौकार आणि एका षटकारासह 51 धावांची खेळी केली. फिरकीपटू राहुल चहरने राणा आणि वेंकटेश यांना बाद करत सामन्यात थोडी रंगत निर्माण केली. पण आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांनी चांगली फलंदाजी करत सामना शेवटच्या षटकात पोहोचवला.

शेवटच्या षटकात फक्त 6 धावांची गरज असताना पंजाबकडून अर्शदीप सिंगने पहिल्या 5 चेंडूंवर 5 धावा दिल्या आणि रसेलला रनआऊट केले. रसेलने 23 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 42 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना रिंकूने चौकार खेचत पुन्हा एकदा कोलकाताला शानदार विजय मिळवून दिला. रिंकूने 2 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 21 धावांची खेळी केली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

 

Leave a comment