IPL 2023 : रिंकू सिंह शेवटच्या बॉलपर्यंत लढत राहिला, पण..! कोलकाता स्पर्धेबाहेर

WhatsApp Group

IPL 2023 KKR vs LSG : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाइट रायडर्सचा एका धावेने पराभव केला. केकेआरच्या रिंकू सिंहने शेवटच्या षटकापर्यंत लखनऊला दम दिला. शेवटी कृणाल पंड्याचा संघ विजयी झाला. यासह लखनऊने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. त्याचबरोबर केकेआरचा या स्पर्धेतील प्रवास संपला आहे. या सामन्यात रिंकू सिंहने 33 चेंडूत 67 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि चार षटकार आले. तो 203 च्या स्ट्राईक रेटने धावा करताना दिसला.

शेवटच्या दोन षटकात केकेआरला विजयासाठी 41 धावांची गरज होती. लखनऊ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते पण रिंकूचा संघ अवघ्या एका धावेने हरला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने 7 गडी गमावून 176 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना जेसन रॉय आणि व्यंकटेश अय्यर यांनी कोलकाता नाइट रायडर्सला चांगली सुरुवात करून दिली. रॉयने सात चौकार आणि एक षटकार मारत 28 चेंडूत 45 धावा केल्या. त्याच धर्तीवर अय्यरने 15 चेंडूत 24 धावा केल्या. या दोघांनी मिळून पॉवरप्लेमध्ये ६१ धावा केल्या. यानंतर केकेआरने पुढील 21 धावांत तीन विकेट गमावल्या. क्रुणालने जेसनला फिरकीच्या जाळ्यात अडकवले. कर्णधार नितीश राणा फिरकीपटू रवी बिश्नोईच्या जाळ्यात अडकला. कृष्णप्पा गौतमने व्यंकटेश अय्यरला आपला बळी बनवले. केकेआरने 120 धावांपर्यंत मजल मारत रहमानुल्ला गुरबाज 10(15) आणि आंद्रे रसेल 7(9) यांनाही गमावले.

हेही वाचा – IPL 2023 : जडेजासमोर वॉर्नरने केली तलवारबाजी..! नक्की काय घडलं? पाहा Video

यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कृणाल पांड्याच्या संघाने 71 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. करण शर्मा तीन धावा करून बाद झाला. क्विंटन डी कॉकने 27 चेंडूत 28 धावा केल्या तर प्रेरक मंकडने 20 चेंडूत 26 धावांचे योगदान दिले. मार्कस स्टॉइनिसला खातेही उघडता आले नाही. कृणाल पांड्यालाही केवळ नऊ धावांचे योगदान देता आले. पहिल्या 10 षटकांचा खेळ पाहिल्यानंतर लखनऊचा सामना हरला असे वाटले.

निकोलस पूरन आणि आयुष बदोनी यांनी सहाव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी करून पुनरागमन केले. या काळात निकोलस पूरनने 30 चेंडूत 58 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून पाच षटकार आणि चार चौकार आले. 21 चेंडूत आयुषच्या बॅटमधून महत्त्वपूर्ण 25 धावा आल्या.

Leave a comment