IPL 2023 : शुबमन गिलने मुंबई इंडियन्सला रडवलं..! चेन्नई-गुजरात खेळणार फायनल

WhatsApp Group

IPL 2023 GT vs MI Qualifier 2 : आयपीएल 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेते गुजरात टायटन्स यांच्यात पाहायला मिळणार आहे. विशाल धावसंख्या बनलेल्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्ससमोर 234 धावांचे लक्ष्य ठेवले. गुजरातकडून शुबमन गिलने 129 धावांची शतकी खेळी केली. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सनेही कडवा प्रतिकार केला, पण त्यांना सामना जिंकता आला नाही. मुंबईने हा सामना 62 धावांनी गमावला. आता 28 मार्चला महाविजेतेपदासाठी चेन्नई आणि गुजरात आमनेसामने असतील.

शुबमन गिलचे शतक

टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेणाऱ्या मुंबईचा निर्णय सपशेल अपयशी ठरला. शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी गुजरातला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 54 धावा फलकावर लावल्यानंतर पीयुष चावलाने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मात्र शुबमनने साई सुदर्शनला सोबत घेत संघाला दोनशेपारच पोहोचवले. दरम्यान शुबमनने यंदाच्या हंगामातील तिसरे शतक पूर्ण केले. त्याने 60 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांसह 129 धावा केल्या. 17व्या षटकात आकाश मधवालने त्याला बाद केले. त्यानंतर हार्दिक पांड्या (28) आणि राशिद खान यांनी शेवटपर्यंत फटकेबाजी केली. 20 षटकात गुजरातने 3 बाद 233 धावा केल्या.

हेही वाचा – GT Vs MI Qualifier 2 : इशान किशन अचानक मैदानाबाहेर का गेला? ओपनिंगला का आला नाही?

मुंबईकडून कडवी झुंज

प्रत्युत्तरात मुंबईकडून नेहल वढेरा आणि रोहित शर्मा सलामीला आले. इशान किशन दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो ओपनिंगला येऊ शकला नाही. मोहम्मद शमीने रोहित (8) आणि नेहल (4) यांना स्वस्तात तंबूत पाठवले. सुरुवातीच्या दोन धक्क्यानंतर तिलक वर्माने आक्रमक रुप धारण करत 14 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 43 धावा फटकावल्या. राशिद खानने त्याला बाद केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन यांनी संघाला शतकापार पोहोचवले. 10 षटकात मुंबईने 110 धावा केल्या. ग्रीन (30) मोठी खेळी करणार असे वाटत असताना जोशुआ लिटलने त्याला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर सूर्यकुमारने मोर्चा सांभाळत अर्धशतक पूर्ण केले. मोक्याच्या क्षणी सूर्यकुमार बाद झाला. त्याने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 61 धावा केल्या. विष्णू विनोदही (5) स्वस्तात बाद झाला. मोहित शर्माने 15व्या षटकात दोघांना बाद केले. टिम डेव्हिड (2) राशिद खानचा शिकार ठरला. त्यानंतर मोहितने मुंबईला अजून धक्के दिले. त्याने 2.1 धावात 10 धावा देत 5 बळी टिपले. मुंबईचा संघ 18.2 षटकात 171 धावांत आटोपला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment