IPL 2023 Final : धोनी जिंकला…! जडेजाच्या पराक्रमामुळे CSK ला पाचवे विजेतेपद

WhatsApp Group

IPL 2023 Final GT vs CSK : जगातील सर्वोत्तम कप्तान महेंद्रसिंह धोनीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. चेन्नई सुपर किंग्जने पाचवे विजेतेपद पटकावले. अहमदाबादमध्ये रंगलेल्या आयपीएलच्या सर्वात मोठ्या फायनलमध्ये चेन्नईने गुजरात टायटन्सला 5 गड्यांनी मात दिली. शेवटच्या दोन षटकात चेन्नईला विजयासाठी 10 धावा हव्या होत्या. रवींद्र जडेजाने एक षटकार आणि एक चौकार ठोकत चेन्नईला विक्रमी जेतेपद मिळवून दिले. आता मुंबईसोबत चेन्नईकडे 5 जेतेपदे आहेत.

चेन्नईच्या डावातील पहिल्या तीन चेंडूनंतर पावसाचा व्यत्यय आला. त्यानंतर काही षटके कमी करण्यात आली. चेन्नईला 15 षटकात 171 धावांचे लक्ष्य मिळाले. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी दमदार सलामी दिली. पहिल्या 6 षटकात 72 धावा फलकावर लावल्या. नूर अहमदने ऋतुराजला (26) झेलबाद करत गुजरातला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर नूरनेच कॉनवेलाही झेलबाद करत चेन्नईला अजून एक धक्का दिला. कॉनवेने 25 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 47 धावा केल्या. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनी संघाला शतकापार पोहोचवले. रहाणेने आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 2 चौकार आणि 2 षटकारांसह 27 धावा केल्या. तो 11व्या षटकात बाद झाला. त्यानंतर रायुडूने तुफानी अंदाजात फटकेबाजी करत चेन्नईला विजयाच्या जवळ आणले. मोहित शर्माने त्याला बाद केले. रायुडूने 2 षटकार आणि एका चौकारासह 19 धावा ठोकल्या. चेन्नईला विजयासाठी 14 चेंडूत 22 धावा हव्या असताना धोनी आला, पण तो मोहितच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. मोहितने जबरदस्त गोलंदाजी करत चेन्नईची भंबेरी उडवली. चेन्नईला विजयासाठी 6 चेंडूत 13 धावांची गरज होती. मोहितने या षटकातील पहिल्या चार चेंडूवर फक्त 3 धावा दिल्या. त्यानंतर रवींद्र जडेजाने एक षटकार आणि चौकार खेचत विजयी धाव घेतली. जडेजाने नाबाद 15 धावा दिल्या. गुजरातकडून मोहितने 3 बळी घेतले.

हेही वाचा – लहान मुलांना मोबाईल देणाऱ्या पालकांनो, ‘हे’ वाचा नाहीतर पश्चात्ताप होईल!

गुजरातचा डाव

गुजरातचा सलामीवीर शुबमन गिलला तीन धावांवर जीवदान मिळाले. दीपक चहरने त्याचा सोपा झेल सोडला. त्यानंतर गिलने चांगले फटके खेळत 39 धावा केल्या. धोनीने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर त्याला स्टम्पिंग केले. त्यानंतर चेन्नईकर साई सुदर्शन आणि वृद्धिमान साहा यांनी संघासाठी फटकेबाजी केली. साहाने 5 चौकार आणि एका षटकारासह 54 धावा केल्या. साहा बाद झाल्यानंतर साईने आक्रमक फटकेबाजी केली. शेवटच्या षटकात साई बाद झाला. त्याचे शतक फक्त चार धावांनी हुकले. त्याने 8 चौकार आणि 6 षटकारांसह 96 धावा केल्या. हार्दिक 21 धावांवर नाबाद राहिला. 20 षटकात गुजरातने 4 बाद 214 धावा केल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment