IPL 2023 : कोलकाताचे ‘जय-वीरू’ थालाला नडले..! CSK चा चेपॉकवर 6 विकेट्सने पराभव

WhatsApp Group

IPL 2023 CSK vs KKR : आयपीएल 2023 च्या 61 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा सहा विकेट्सने पराभव केला. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकात्याला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी 9 चेंडू राखून पूर्ण केले. या विजयामुळे कोलकाता नाइट रायडर्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत आहेत. आहेत. कोलकाताच्या विजयाचे हिरो ठरले रिंकू सिंह आणि नितीश राणा. या दोघांनी अर्धशतके ठोकत महत्त्वाची भागीदारी रचली.

लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. दीपक चहरने पॉवरप्लेमध्येच गुरबाज, व्यंकटेश अय्यर आणि जेसन रॉय यांना बाद केले. यामुळे कोलकात्याची धावसंख्या एकावेळी तीन बाद 33 अशी होती. मात्र कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंह यांनी शानदार फलंदाजी करत कोलकात्याला विजय मिळवून दिला. रिंकू आणि राणा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली.

रिंकू सिंहने 43 चेंडूत 54 धावा केल्या, ज्यात चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. त्याचवेळी नितीश राणाने 44 चेंडूत 57 धावांची नाबाद खेळी केली. नितीश राणाने आपल्या खेळीत सहा चौकार आणि एक षटकार लगावला.

हेही वाचा – IPL 2023 : फक्त 59 धावांत ऑलआऊट..! RCB समोर राजस्थान रॉयल्सचा ‘फुसका’ बार

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजीला घेतली. सलामीवीर ऋतुराज गायकवाडची विकेट संघाने स्वस्तात गमावली. ऋतुराजला फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने वैभव अरोराकरवी झेलबाद केले. यानंतर अजिंक्य रहाणे आणि डेव्हन कॉनवे यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी झाली. रहाणेला चक्रवर्तीने बाद केल्यानंतर सीएसकेचा डाव गडगडला आणि त्यांनी ठराविक अंतराने विकेट गमावल्या. काही वेळातच चेन्नईची धावसंख्या 61/1 वरून 5 गड्यांच्या मोबदल्यात 72 वर गेली.

येथून शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी 68 धावांची भागीदारी करत सीएसकेला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. शिवम दुबेने 34 चेंडूंचा सामना करत नाबाद 48 धावा केल्या, ज्यात तीन षटकार आणि एक चौकार समाविष्ट होता. आणि जडेजाने एका षटकाराच्या मदतीने 20 धावा केल्या. कर्णधार धोनीने तीन चेंडूत दोन धावा केल्या. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी दोन खेळाडूंना माघारी धाडले.

Leave a comment