IPL 2023 CSK vs DC : दिल्लीचा खेळ खल्लास..! चेन्नई सुपर किंग्जचा ‘सोपा’ विजय

WhatsApp Group

IPL 2023 CSK vs DC : चेपॉकच्या मैदानावर रंगलेल्या आयपीएल 2023 च्या 55व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 27 धावांनी पराभव केला. फिरकीला पोषक ठरणारी संथ खेळपट्टी चेन्नईने बरोबर हेरली आणि टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. छोट्या-छोट्या भागीदारी करत चेन्नईने दिल्लीला 168 धावांचे आव्हान दिले. पण दिल्लीला 140 धावांपर्यंत पोहोचता आले. या पराभवामुळे दिल्लीचे यंदाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. गुणतालिकत चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे 15 गुण झाले आहेत.

चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत आठ गडी बाद 167 धावा केल्या. चेन्नईसाठी या सामन्यात एकाही फलंदाजाने 30 धावांचा टप्पा ओलांडला नाही. शिवम दुबेने 12 चेंडूत सर्वाधिक 25 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने 24, अंबाती रायडूने 23, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणेने 21-21 धावा केल्या. डेव्हन कॉनवेने 10 आणि मोईन अलीने सात धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या षटकात वेगवान धावा केल्या. त्याने नऊ चेंडूत 20 धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल मार्शने तीन आणि अक्षर पटेलने दोन विकेट घेतल्या. खलील अहमद, ललित यादव आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

हेही वाचा – Video : धोनीला भेटणारी ही 3 माणसं कोण, ज्यांना CSK ची ‘स्पेशल’ जर्सी मिळाली?

प्रत्युत्तरात दिल्लीला पहिल्याच षटकात डेव्हि़ड वॉर्नरच्या (0) रुपाने पहिला धक्का बसला. दीपक चहरने त्याला आणि फिल सॉल्टला (17) माघारी पाठवले. मिचेल मार्श (5) धावबाद झाला. रायली रूसो (35) आणि मनीष पांडेने (27) भागीदारी केली, पण त्यांना वेगात धावा करता आल्या नाही. धावांचे अंतर वाढल्याने दिल्लीने मधल्या षटकात विकेट्स गमावल्या. अक्षर पटेलने 21 धावांची खेळी केली पण तोपर्यंत उशीर झाला. दिल्लीने 20 षटकात 8 बाद 140 धावा केल्या. चेन्नईकडून पाथिरानाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment