फक्त चेतेश्वर पुजाराचीच संघातून हकालपट्टी का? मग विराट, रोहितचं काय?

WhatsApp Group

Cheteshwar Pujara : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात चेतेश्वर पुजाराची निवड न झाल्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली, कारण फॉर्मात नसलेले विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांना संघात निवडले गेले. मुंबईच्या सरफराज खानची निवड केव्हा होणार, असा प्रश्न अनेक समीक्षकांना अजूनही पडला आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर रंगलेल्या WTC फायनलमध्ये पुजारा दोन्ही डावांत अपयशी ठरला. तेव्हापासूनच तो संघाबाहेर होणार असे चर्चेत होते आणि शेवटी तसेच झाले.

चेतेश्वर पुजारा हा आधुनिक क्रिकेटमधील असा अपवादात्मक खेळाडू आहे ज्याकडे कसोटी क्रिकेटमधील स्पेशालिस्ट म्हणून पाहिले जाते. पण ही गोष्ट नेहमीच त्याला मारक ठरते. कारण संघातील इतर खेळाडू आयपीएल किंवा एकदिवसीय किंवा टी-20 क्रिकेटमध्ये धावा करून त्यांच्या कसोटी क्रिकेटमध्ये स्थान कव्हर करतात, परंतु पुजाराच्या बाबतीत असे घडत नाही.

मागच्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीत पुनरागमन केल्यापासून पुजाराने मोठी कामगिरी केलेली नाही. 2020 पासून, त्याची कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी अतिशय सामान्य आहे. पण, या काळात पुजाराची 29.69 (28 सामन्यांत) सरासरी कोहलीच्या (29.69) सारखीच आहे, पण कोहली हा राजा आहे आणि राजाच्या कसोटीच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह लावण्याचे धाडस किती जण करू शकतात? भारतासाठी सर्वोत्तम संघ निवडणे हे निवड समितीचे कार्य, पण कोहली, शर्मा यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचे धाडस त्यांच्यात नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – टायटॅनिकमध्ये बसण्यासाठी तिकीट किती होतं? जहाजात कोणत्या सुविधा होत्या?

कोहली आणि पुजारा यांच्यात तुलना होऊ शकत नाही आणि हा युक्तिवाद मान्य केला जाऊ शकतो, परंतु पुजाराप्रमाणेच अजिंक्य रहाणे देखील केवळ कसोटी क्रिकेट खेळतो आणि गेल्या 15 महिन्यांपासून कसोटी संघाबाहेर होता. याचे कारण म्हणजे ओव्हल कसोटीपूर्वी 19 सामन्यांत त्याची सरासरी 25 पेक्षा कमी होती. पण, ओव्हलवर पॅट कमिन्सने रहाणेला दिलेल्या नो बॉलने रहाणेला केवळ त्या डावात जीवदानच दिले नाही तर त्याच्या कसोटी कारकिर्दीत नवसंजीवनीही दिली. आता रहाणे हा केवळ कसोटी संघाचा महत्त्वाचा फलंदाजच नाही तर उपकर्णधारही आहे. याचा अर्थ असाही होतो की, निवड समिती आणि बीसीसीआय एकदिवसीय विश्वचषकानंतर कसोटी कर्णधारपदासाठी रोहित शर्माशिवाय अन्य पर्यायाचा विचार करायचा असेल, तर रहाणेसारखा पर्याय त्यांच्याकडे आहे, कारण गेल्या काही वर्षांपासून ज्या तीन खेळाडूंना या भूमिकेसाठी तयार केले जात होते ते सध्या अनफिट आहेत. केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत.

राहुलचा विचार केला तर त्याच्यासोबत युवा सलामीवीर शुबमन गिलचाही विचार केला जाऊ शकतो, जो गेल्या दोन वर्षांत पुजाराच्या तुलनेत फारसा यशस्वी ठरला नाही. गिलची सरासरी (16 सामन्यांत 32.89), राहुलची सरासरी (11 सामन्यांत 30.28) असे दर्शवते की गेल्या काही वर्षांत भारतीय फलंदाजांनी मायदेशात आणि परदेशात एकत्रितपणे खराब कामगिरी केली आहे.

अशा परिस्थितीत पुजाराला बळीचा बकरा का बनवण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे वय (35 वर्षे) त्याच्या मार्गात येण्याची शक्यता आहे. तरीही, पुजाराने 103 कसोटी सामने खेळले आहेत आणि भारताचा पुढील कठीण दौरा या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा असेल, जिथे पुजाराने मागील 4 दौऱ्यांमध्ये 19 डावांमध्ये केवळ एक शतक झळकावले आहे. कदाचित या गोष्टी लक्षात घेऊन निवड समितीने यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.

पुजाराच्या कसोटी कारकिर्दीचा हा शेवट ठरला, तर त्याला त्याच्या प्रवासाचा अभिमान वाटायला हवा. येणाऱ्या काळात फार कमी खेळाडू असतील जे कसोटीत भारतासाठी 100 सामने खेळतील, कदाचित रोहित शर्मासारखा दिग्गज खेळाडूही 100 कसोटी सामने खेळू शकणार नाही. रोहित-कोहलीचे ग्लॅमर किंवा रहाणेचा थरारक स्ट्रोक-प्ले तुम्हाला पुजारामध्ये कदाचित दिसणार नाही पण संघासाठी खेळणारा खेळाडू म्हणून पुजाराचे नाव नक्कीच घेतले जाईल. कसोटीत भारतीय संघ पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहण्यापाठी पुजाराने नक्कीच सिंहाचा वाटा उचलला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment