Asia Cup 2022 : आशिया चषक २०२२च्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. हा सामना (IND vs PAK) रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं २० षटकांचा एक चेंडू शिल्लक असताना पाकिस्तानला १४७ धावांत ऑलआउट केले. भारतीय संघानं हे लक्ष्य पाच गडी आणि दोन चेंडू राखून पूर्ण केले. हार्दिक पंड्यानं षटकार ठोकत या रोमांचक सामन्याचा शेवट केला.
मात्र, टीम इंडियासाठी हा विजय सोपा नव्हता. डावाच्या दुसऱ्या चेंडूवर केएल राहुलच्या विकेटमुळं भारताची सुरुवात चांगली झाली नाही. विराट कोहली आणि रवींद्र जडेजाच्या प्रत्येकी ३५ धावांनी संघाला स्थिरता मिळवून दिली आणि धावफलक चालू ठेवला. अखेरीस हार्दिक पंड्यानं नाबाद ३३ धावांची स्फोटक खेळी खेळून संघाला विजयापर्यंत नेले.
हेही वाचा – IND Vs PAK Asia Cup 2022 : “आम्हाला माहीत होतं…”, पाकिस्तानला हरवल्यानंतर रोहित काय म्हणाला? वाचा!
विशेषत: शेवटच्या षटकात हार्दिकचा आत्मविश्वास पाहण्यासारखा होता. भारताला शेवटच्या चार चेंडूत ६ धावांची गरज होती. त्यानंतर मोहम्मद नवाजने निर्धाव चेंडू टाकला. पण यामुळे पंड्याच्या मनोधैर्यावर काही फरक पडला नाही. नॉन स्ट्राइकवर उभ्या असलेल्या दिनेश कार्तिककडं बोट दाखवत हार्दिकनं ‘गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत’, अशी प्रतिक्रिया दिली. त्याची ही रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानं पुढच्याच चेंडूवर षटकार मारून सामना संपवला.
Ye chiller attitude 🤙before the six that made 🇮🇳 win tonight is… everything!!Respect to @hardikpandya7 training and confidence! #INDvsPAK https://t.co/q0ChEbM1OG
— Mukti Mohan (@thisIsMukti) August 28, 2022
हेही वाचा – IND Vs PAK Asia Cup 2022 : ज्या मैदानावर झुकली मान, तिथंच घेतला बदला..! भारताची पाकिस्तानवर मात
या सामन्यात हार्दिकनं प्रथम गोलंदाजीत तीन बळी घेतले आणि त्यानंतर फलंदाजीत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं नाबाद ३३ धावा केल्या. हार्दिकनं मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद आणि खुशदिल शाह यांच्या विकेट घेतल्या. पंड्याच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
विजयानंतर रोहितनं हार्दिकचं केलं कौतुक
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला, ”लक्ष्याच्या निम्म्यापर्यंत आम्हाला माहीत होतं, की आम्ही कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकू शकतो. जेव्हापासून त्यानं (हार्दिक) पुनरागमन केले तेव्हापासून तो शानदार खेळत आहे. जेव्हा तो संघाचा भाग नव्हता तेव्हा त्यानं आपल्या शरीराचे आणि त्याच्या फिटनेसचं काय करावं लागेल याचा विचार केला. आता तो १४० पेक्षा अधिक वेगानं गोलंदाजी करत आहे. दुसरीकडं, हार्दिकच्या फलंदाजीबाबत रोहित म्हणाला, आपल्या सर्वांना माहीत आहे की तो बॅटनं काय करू शकतो. कमबॅक केल्यापासून, तो खूप शांत आणि आत्मविश्वासू झाला आहे. तो वेगवान गोलंदाजी करू शकतो. फक्त त्याचा खेळ समजून घेण्याची बाब आहे आणि तो चांगली कामगिरी करत आहे.”