IND vs NZ World Cup 2023 In Marathi : रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने वर्ल्डकप 2023 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात बलाढ्य न्यूझीलंडचा 4 विकेट्स राखून पाडाव केला आहे. यासह भारताने 2019च्या वर्ल्डकप सेमीफायनलचा बदलाही पूर्ण केला. आयसीसी स्पर्धांमध्ये त्वेषाने खेळणारी न्यूझीलंड यावेळी भारताला थांबवू शकली नाही. संध्याकाळच्या वेळेला पडणारा दव आणि संथ होत जाणारी खेळपट्टी लक्षात घेता भारताचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. धरमशाला येथे रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 274 धावांचे आव्हान दिले. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादवला संधी मिळाली. शमीने शेवटच्या षटकात आक्रमक गोलंदाजी करत न्यूझीलंडचा अर्धा संघ गारद केला. प्रत्युत्तरात चेसमास्टर विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे भारताने 48व्या षटकात विजय साकारला. भारताने पाचपैकी पाच सामने जिंकले असून ते आता गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहेत. शमीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
न्यूझीलंडचे सलामीवीर फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. डेव्हॉन कॉनवे शून्यावर मोहम्मद सिराजचा बळी ठरला. यानंतर मोहम्मद शमीने विल यंगला बोल्ड केले. यंगने 17 धावा केल्या. 19 धावांवर दुसरी विकेट पडली. रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी नाबाद शतकी भागीदारी करत संघाचा ताबा घेतला. रचिनने 6 चौकार आणि एका षटकारासह 75 धावा केल्या, तर डॅरिल मिचेलने शतक ठोकत भारतीय गोलंदाजांना हैराण केले. मिचेलने 9 चौकार आणि 5 षटकारांसह 130 धावा केल्या. हे दोघे न्यूझीलंडला तीनशेपार पोहोचवणार असे वाटत असताना मोहम्मद शमीने या दोघांनाही बाद केले. शमीने 54 धावांत 5 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडने 50 षटकात 10 बाद 273 धावा केल्या. कुलदीप यादवने दोघांना बाद केले.
प्रत्युत्तरात रोहित शर्माने पुन्हा एकदा आक्रमक शैलीत डावाची सुरुवात करून दिली. त्याने शुबमन गिलसह पहिल्या गड्यासाठी 71 धावा जोडल्या. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर विराट कोहलीने किल्ला लढवायला सुरुवात केली. न्यूझीलंडने एका बाजूने श्रेयस अय्यर (33), केएल राहुल (27) आणि सूर्यकुमार यादव (2) यांना बाद केले. पण विराटने रवींद्र जडेजासह विजय समीप आणला. जडेजाने 3 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 39 धावांची खेळी केली. विराटचे शतक फक्त 5 धावांनी हुकले. त्याने 8 चौकार आणि 2 षटकारांसह 95 धावांची खेळी केली. मग जडेजाने 48व्या षटकात मॅट हेन्रीला चौकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!