अवघ्या १००० रुपयांवर आलीय विनोद कांबळीची कमाई! म्हणाला, “मला नोकरी…”

WhatsApp Group

Vinod Kambli financial condition : भारतरत्न सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात पदार्पण करणारा फलंदाज विनोद कांबळी सध्या हलाखीच्या अवस्थेत जगत आहे. त्याच्या कमाईचा एकमेव स्त्रोत म्हणजे त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) मिळणारी पेन्शन राहिली आहे, ज्यामुळं त्याचं जगणं कठीण झालं आहे. एकेकाळी क्रिकेटच्या खेळपट्टीवर सगळ्यांना तोडणारा कांबळी लाखोंमध्ये कमवायचा, पण सध्या तो आर्थिक विवंचनेशी झुंजत आहे. “मला नोकरीची गरज आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडं गेलो होतो. मला माझं घर चालवायचं आहे”, असं कांबळीनं म्हटलं.

कांबळीचं रोजचं उत्पन्न…

१८ जानेवारी १९७२ रोजी मुंबईत जन्मलेल्या विनोद कांबळीला गुरू रमाकांत आचरेकर यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा अधिक प्रतिभावान मानलं होतं. पण सचिन शिखरावर पोहोचला. मिड डेच्या वृत्तानुसार, सध्या कांबळीला बीसीसीआयकडून मासिक ३०,००० रुपये पेन्शन (बीसीसीआय पेन्शन) वर जगावं लागतं. म्हणजेच त्याचं दररोजचं उत्पन्न फक्त १००० रुपये आहे.

विनोद कांबळीची एकूण संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी भारतीय क्रिकेटर विनोद कांबळीची एकूण संपत्ती १ ते १.५ मिलियन डॉलर्स दरम्यान आहे. २०२२ च्या सुरुवातीला आलेल्या आकडेवारीनुसार, त्याचं वार्षिक उत्पन्न केवळ चार लाख रुपये राहिलं आहे. मात्र, मुंबईत त्याचं स्वतःचं घर आहे. पण देशाच्या आर्थिक राजधानीत राहण्यासाठी हे अपुरं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे रेंज रोव्हर कार आहे.

कोरोना नंतर बदलली परिस्थिती

क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतरही त्याच्याकडं काही काळ कमाईची अनेक साधनं होती. त्यानं क्रिकेट सामन्यांमध्ये कॉमेंट्री केली, जाहिरातींमध्ये काम केलं. त्यामुळं त्याला भरपूर पैसे मिळत गेले. इतकंच नाही तर चित्रपटांमध्ये अभिनय करत कमाईही केली. पण कालांतरानं त्याची कमाई संपली. कोरोना महामारीपासून त्याची परिस्थिती बिकट होत आहे.

हेही वाचा – मित्राला भेटायला गेला आणि फसला..! ‘तो’ प्रकार पाहून रोहित शर्मानं कपाळावर मारला हात; पाहा VIDEO

तेंडुलकरनं नेहमीच केलीय मदत

५० वर्षीय विनोद कांबळीचं पूर्ण नाव विनोद गणपत कांबळी असून त्याचं दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे. कमाईचं साधन बंद झाल्यामुळं आता त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. कांबळीनं असंही सांगितलं, आहे की त्याचा माजी सहकारी आणि मित्र सचिन तेंडुलकरला देखील त्याच्या स्थितीची जाणीव आहे, परंतु सचिननं त्याला खूप मदत केली असल्यानं तो त्याच्याकडून कोणतीही आशा बाळगत नाही.

२०१९ मध्ये शेवटचे कोचिंग

कांबळीनं २०१९ मध्ये शेवटच्या वेळी संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं होतं, जेव्हा तो टी-२० मुंबई लीगमध्ये सहभागी होता. त्यानंतर २०२० मध्ये कोरोना व्हायरसनं देशात आणि जगात थैमान घातलं. तेव्हापासून इतर देशवासीयांसाठीच नाही तर कांबळीसाठीही परिस्थिती बदलली आहे. या साथीच्या प्रादुर्भावानं कांबळीकडं राहिलेलं कमाईचं साधनही नष्ट झालं.

हेही वाचा – “जन्माच्या ३६ तासानंतर माझ्या आई-बापानं मला सोडून दिलं, कारण मी असा दिसतो”

पोलिसांनी केली होती अटक!

विनोद कांबळी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीपेक्षा जास्त वादांमुळं चर्चेत राहिला. काही दिवसांपूर्वीच कांबळी प्रसिद्धीच्या झोतात आला होती, जेव्हा त्याला दारूच्या नशेत गाडी चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये, कांबळीनं मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना वाहनाला धडक दिली होती, त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, काही वेळानं त्याला जामीनही मिळाला.

कांबळीचं करियर…

विनोद कांबळीनं भारतासाठी एकूण १०४ एकदिवसीय आणि १७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यानं भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३५६१ धावा केल्या आहेत, ज्यात कसोटीमध्ये चार शतकं आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतकं आहेत. कांबळीनं १९९१ मध्ये भारतासाठी वनडे पदार्पण केले होते, तर २००० मध्ये त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment