FIFA World Cup Final : कतार येथे झालेल्या फिफा विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला. तब्बल ३६ वर्षांनंतर अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकता आला आहे. १९७८ आणि १९८६ नंतर अर्जेंटिनाने आता तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. निर्धारित ९० मिनिटे सामना २-२ असा बरोबरीत राहिल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला. तिथे लिओनेल मेस्सीने गोल करून अर्जेंटिनाला ३-२ ने आघाडीवर नेले, पण किलियन एमबाप्पेच्या मनात काही वेगळेच होते. त्याने ११७ व्या मिनिटाला गोल करून सामना ३-३ असा बरोबरीत आणला. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने सामना जिंकला.
कतारचा लुसेल स्टेडियम रविवारी १८ डिसेंबर २०२२ रोजी एका ऐतिहासिक फुटबॉल सामन्याचा साक्षीदार झाला. पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव करून अर्जेंटिनाने विश्वचषक आपल्या नावी केला. जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक, लिओनेल मेस्सी आणि युवा स्टार किलियन एमबाप्पे या दोघांवर आज पूर्ण जगाचे लक्ष होते. मेस्सीने दोन आणि एम्बाप्पेने तीन गोल केले.
हेही वाचा – Video : टीम इंडियानं बांगलादेशला हरवून जिंकला टी-२० वर्ल्डकप..! पाहा विनिंग मोमेंट
लिओनेल मेस्सीने २३ व्या मिनिटाला पेनल्टीवर सामन्यातील पहिला गोल केला. विश्वचषकातील सर्व बाद फेरीत गोल करणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला. त्यानंतर ३६ व्या मिनिटाला अँजेल डी मारियाने गोल करून अर्जेंटिनाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत अर्जेंटिनाचा संघ २-० ने पुढे होता. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी आक्रमणे सुरूच ठेवली मात्र गोल होऊ शकला नाही. ८० मिनिटांपर्यंत अर्जेंटिना सामना सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र किलियन एमबाप्पेने दोन मिनिटांत दोन गोल करत सामन्याचे चित्र फिरवले. त्याने ८० व्या आणि ८१ व्या मिनिटाला गोल केले.
निर्धारित ९० मिनिटांनंतर स्कोअर २-२ असा बरोबरीत राहिल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला. तेथे दोन्ही संघांना प्रत्येकी १५-१५ मिनिटांचे दोन हाफ मिळाले. लिओनेल मेस्सीने १०८ व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला सामन्यात ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. पुन्हा एकदा अर्जेंटिना विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसत होते, परंतु किलियन एमबाप्पेने पुन्हा त्यांच्या मार्गात उभा राहिला. त्याने ११७ व्या मिनिटाला गोल करून सामना 3-3 असा बरोबरीत आणला. यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला. तिथे अर्जेंटिनाने हा सामना ४-२ असा जिंकला.