Fact Check Peles Feet In Museum : ब्राझीलचे सुप्रसिद्ध दिवंगत फुटबॉलपटू पेले यांच्याबाबत सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, त्यांच्या कुटुंबीयांच्या संमतीने त्यांचे पाय संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. काही लोकांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे. अशी पोस्ट पाहून अनेकांना संभ्रम निर्माण झाला आहे.
पीटीआयने केलेल्या तथ्य तपासणीनुसार दिवंगत फुटबॉलपटू पेलेंचे पाय संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचा दावा खोटा आहे. जागतिक फुटबॉलची प्रशासकीय संस्था फिफानेही असा दावा दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे.
पेलेंबाबत केलेला दावा खोटा
फुटबॉलपटू पेलेचे पूर्ण नाव एडसन अरांतेस डो नासिमेंटो आहे. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये त्यांचा समावेश होतो. गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराला हजारो लोक उपस्थित होते. त्यानंतर अशा अनेक गोष्टी सोशल मीडियात आल्या, त्यामुळे संभ्रम पसरला. उदाहरणार्थ, ३ जानेवारी रोजी पेलेंचे पाय संग्रहालयात ठेवण्याबाबत फेसबुक पोस्ट लिहिली होती. जगभरातील लोकप्रियतेमुळे ही पोस्ट व्हायरल झाली आणि त्यानंतर अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या
हेही वाचा – PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार पूर्ण ४००० रुपये..! बजेटपूर्वी आलं ‘हे’ अपडेट; जाणून घ्या!
तथ्य तपासणी संस्थांनी दिशाभूल करणाऱ्या दाव्याची चौकशी केली. भारतीय वृत्तसंस्था ‘पीटीआय’ने आपल्या तपासणीत पेले आणि फिफाबद्दल सोशल मीडियावर शेअर केलेला दावा खोटा असल्याचे आढळले. फिफाच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडलवर अशी कोणतीही घोषणा शोधण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्याच्याशी संबंधित काहीही सापडले नाही.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये टीएनटी स्पोर्ट्सचा हवाला देण्यात आला होता, परंतु टीएनटीच्या वेबसाइट आणि ट्विटर हँडलवर केलेल्या शोधात त्याच्याशी संबंधित कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यानंतर पेले यांच्या मृत्यूशी संबंधित शब्दांबाबत पुन्हा गूगल सर्च करण्यात आले, तेव्हाही पेले यांचे पाय संग्रहालयात ठेवल्याची कोणतीही बातमी आढळून आली नाही. नंतर, तपास पुढे नेत, फॅक्ट चेक टीमने फिफाला ई-मेल केला. फिफाच्या प्रवक्त्याने ईमेलमध्ये सांगितले की, आम्ही हा दावा पूर्णपणे नाकारतो. त्यामुळे पेले आणि फिफाबाबत सोशल मीडियावर केलेला दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.