धोनी, कार्तिक ठेवा बाजूला! ऋषभ पंतनं जे केलंय ते कोणत्याच भारतीय विकेटकीपरला करता आलेलं नाही…

WhatsApp Group

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत ऋषभ पंत टीकेचा धनी ठरला होता. त्याच्या नेतृत्वावर आणि कामगिरीवर लोकांनी खरपूस टीका केली होती. इंग्लंडला पोहोचल्यानंतर पंतनं सर्व टीकाकारांची तोंडं बंद केलीत. मागील वर्षी कोरोनामुळं रद्द झालेली कसोटी यावर्षी बर्मिगहॅमच्या एजबस्टन मैदानावर खेळवली जातेय. या कसोटीत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारत खेळत आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळं भारताची टॉप बॅट्समनची फळी गोंधळली आणि त्याचा फटका या सामन्यात संघाला सहन करावा लागला. फक्त ९८ धावांववर भारताचे ५ गडी तंबूत परतले. विराट कोहलीही जास्त काही करू शकला नाही. ४० वर्षीय जेम्स अँडरसन आणि तरणाबांड मॅटी पॉट्स यांनी तिखट मारा करत भारताच्या डावाला खिंडार पाडलं.

संघाला सावरलं…

संघाची दारुण दशा असताना ऋषभ पंत आपली हत्यारं घेऊन उभा राहिला. रवींद्र जडेजाला सोबत घेत त्यानं किल्ला लढवला आणि शतक ठोकलं. पंतनं बघता बघता जडेजासोबत दोनशेपार धावांची भागीदारीही केली. झटपट क्रिकेटचा राजा असलेल्या पंतनं कसोटीतही चौफेर फटकेबाजी करत इंग्लंडच्या आक्रमणाला तोंडात बोटं घालायला लावली. पंत हाताबाहेर जातोय आणि काहीच उपाय होत नाहीये, असं ध्यानात येताच इंग्लंडचा कप्तान बेन स्टोक्सनं जो रूटच्या हाती चेंडू दिला. वेगवान दीडशे धावांचा मनसुबा आखणाऱ्या पंतला रूटनं स्लीपमध्ये झेलबाद केलं. पंतने १११ चेंडूत २० चौकार आणि ४ षटकारांसह १४६ धावांची शानदार खेळी करत सर्वांची वाहवा मिळवली.

शतक एक, विक्रम अनेक…

कसोटी कारकिर्दीतलं पंतचं हे पाचवं शतक ठरलं. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं सामन्याच स्थिती मजबूत केली. २४ वर्षाच्या पंतनं या शतकासह अनेक विक्रम आपल्या नावावर केले. त्यानं कसोटीत दोन हजार धावाही पूर्ण केल्या. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या SENA देशांमधील खेळपट्टी फलंदाजांसाठी धोकादायक मानली जाते, पंतनं आपल्या कारकिर्दीतील पाचपैकी चार शतकं इथेच साजरी केलीत. पंत इंग्लंडमध्ये नववी कसोटी खेळत आहे. त्यानं आतापर्यंत दोन शतके झळकावली आहेत. भारताच्या मागील १७ यष्टीरक्षकांना असं करता आलं नव्हतं.

इंग्लंडमध्ये भारतीय विकेटकीपर…

ऋषभ पंतच्या आधी भारताच्या एकाही यष्टीरक्षक फलंदाजाला इंग्लंडच्या भूमीवर कसोटी शतक झळकावता आलेलं नाही. टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीनं भारतीय विकेटकीपर म्हणून इंग्लंडमध्ये १२ कसोटी सामन्यांमध्ये ८ अर्धशतकं झळकावली. ९२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी खेळली. त्याचवेळी फारुख इंजिनियर यांनी ९ कसोटी सामन्यांमध्ये ४ अर्धशतकं केली. ८७ धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. यांच्याखेरीज इतर कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाला ५०० धावांचा टप्पाही गाठता आलेला नाही. पंतच्या ४५० धावा पूर्ण झाल्या आहेत.

Leave a comment