ENG vs AFG World Cup 2023 : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वांना आश्चर्यचकित करणारी मॅच म्हणजे इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान. गतविजेत्या आणि जगाला क्रिकेट शिकवणाऱ्या इंग्लंडला वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानकडून 69 पराभव स्वीकारावा लागला. अचूक रणनिती, शिस्तबद्ध गोलंदाजी, शेवटपर्यंत झुंज देण्याची तयारी अफगाणिस्तानला ऐतिहासिक विजयाकडे घेऊन गेली. ”ज्या देशात लोक खूप गंभीर दिवस काढतायत, भूकंपाने अवस्था बिकट केलीय अशा देशात फक्त क्रिकेटच आनंदाचा स्त्रोत आहे”, असे राशिद खानने विजयानंतर सांगितले. यावरून हा विजय अफगाणिस्तान आणि तेथील लोकांसाठी किती मोठा आहे, याचा अंदाज येतो.
इंग्लंडच्या माणसाकडून इंग्लंडचा पराभव!
तगड्या इंग्लंडला हरवणे सोपी गोष्ट नव्हती, पण इंग्लंडच्या माजी खेळाडूने समीकरणे जुळवली आणि आपल्याच देशाच्या झोळीत लाजिरवाणा पराभव टाकला. या विजयाचे पडद्याआडचे श्रेय जाते ते इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट याला. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडसाठी खोऱ्याने धावा काढणारा ट्रॉट अफगाणिस्तानचा कोच आहे. आता त्याच्याच मार्गदर्शनाखाली अफगाणिस्तानने इंग्लंडची झोप उडवली. इंग्लंडसाठी आज ट्रॉट खलनायक ठरला असला, तरी अफगाण लोकांच्या मनात तो कायमचा अजरामर झाला.
ट्रॉटला ‘या’ गोष्टी माहीत होत्या!
इग्लंडविरुद्धच्या मॅचसाठी ट्रॉट आणि अफगाण खेळाडूंकडे सर्व योजना होत्या. टी-20 क्रिकेटमध्ये घातक खेळणारा डेव्हिड मलान ऑफ स्पीनरविरुद्ध जरा अडकून खेळतो, इनस्विंगचा जोस बटलरला किती त्रास आहे आणि त्याचा उपाय काय, इंग्लंडची मिडल ऑर्डर स्पिनला चांगली खेळू शकत नाही, हे सर्व ट्रॉट जाणून होता. इंग्लंडच्या या कमकुवतपणाची उत्तरेही अफगाण संघातच होती. त्यामुळे ट्रॉटने आपले पत्ते अचूक फेकले आणि इंग्लंडला गाशा गुंडाळावा लागला.
सामन्याबाबत…
इंग्लंडने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखालील अफगाण संघाने 49.5 षटकांत 284 धावा केल्या. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने 8 चौकार आणि 4 षटकारांसह 80 धावा केल्या. गुरबाजशिवाय इक्रम अलीखिलने 66 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह 58 धावा केल्या, तर खालच्या फळीतील अनुभवी मुजीब उर रहमानने 16 चेंडूत 28 धावांची आक्रमक खेळी केली.
प्रत्युत्तरात बटलर कंपनी 215 धावांत गडगडली. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक 66 धावा केल्या. त्याला मुजीब उर रहमानने बोल्ड केले. इंग्लंडकडून डेव्हिड मलानने 32 धावा केल्या तर जो रूट 11 धावा करून बाद झाला तर लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 10 धावांची खेळी केली. कर्णधार जोस बटलर 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आदिल रशीदने 20 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून युवा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!