लाइव्ह क्रिकेट सामन्यात बॉम्बस्फोट..! थोडक्यात बचावले ‘स्टार’ क्रिकेटपटू; VIDEO व्हायरल!

WhatsApp Group

मुंबई : अफगाणिस्तानात तालिबान राजवट झाल्यानंतर क्रिकेटवर कोणत्याही प्रकारे बंदी घातली गेली नसावी. पण, खेळाडू किती सुरक्षित आहेत, याचा अंदाज एका घटनेवरून लावता येतो. काबुल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये अफगाणिस्तानच्या शापागिझा टी-२० क्रिकेट लीगच्या सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट झाला. यामध्ये चार प्रेक्षक जखमी झाले. पामिर जाल्मी आणि बँड-ए-आमिर ड्रॅगन्स या दोन संघात हा सामना खेळला गेला. अफगाणिस्तानकडून विश्वचषक खेळणारे अनेक खेळाडूही या सामन्यात सहभागी झाले होते. सुदैवाने त्यापैकी कोणालाही दुखापत झाली नाही.

सामना पुन्हा सुरू!

लाइव्ह सामन्यादरम्यान झालेल्या स्फोटानंतर स्टेडियममध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. दोन्ही संघातील खेळाडूंना बंकरच्या आत नेण्यात आलं. हा स्फोट झाला तेव्हा संयुक्त राष्ट्राचे अधिकारीही स्टेडियममध्ये उपस्थित होते. सामना एक तास थांबवावा लागला. मात्र, पोलिसांकडून हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला आणि बँड-ए-आमिर ड्रॅगन्स संघानं डकवर्थ-लुईस नियमानुसार बदललेल्या सामन्यात १० षटकांत १७ चेंडू राखून १ गडी गमावून ९४ धावांचं लक्ष्य गाठलं तत्पूर्वी, पामिर जाल्मी संघानं २० षटकांत ५ गडी गमावून १५९ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – International Friendship Day 2022 : फ्रेंडशिप डे उगाच साजरा नाही करत! त्यालाही एक इतिहास आहे…

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नसीब खान यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितलं, “स्फोटानंतर लगेचच, काबूल पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ज्या स्टॅंडमध्ये स्फोट झाला त्या ठिकाणी जागा रिकामी करून सखोल तपास केला. एक तासानंतर, त्यांनी आम्हाला सामना पुन्हा सुरू करण्यास होकार दिला.”

या सामन्यात खेळत होते स्टार खेळाड़ू!

शापागिझा टी-२० क्रिकेट लीगच्या या सामन्यात अफगाणिस्तानचे अनेक मोठे खेळाडू खेळत होते. यामध्ये विश्वचषकाचा हिरो शापूर जद्रान पामीर जाल्मी संघाचं नेतृत्व करत होता. त्‍यांच्‍याशिवाय, २०२१ टी-२० विश्‍वचषकातील संघाचे राखीव खेळाडू असलेले दौलत झाद्रान आणि या वर्षीच्‍या अंडर-१९ विश्वचषकात अफगाणिस्तान संघासोबत असलेला मोहम्मदउल्ला नजीबुल्ला यांनीही या सामन्यात भाग घेतला होता.

सामना जिंकणारा संघ बँड-ए-अमिर ड्रॅगन्स संघाचा कर्णधार आफताब आलम होता, जो एका वर्षासाठी निलंबित होण्यापूर्वी २०१९ विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानकडून खेळला होता. त्याच्या संघाचा अष्टपैलू करीम जनात हा जूनमध्ये झिम्बाब्वेला गेलेल्या अफगाणिस्तान संघाचा भाग होता. याशिवाय लाहोर कलंदरचा फलंदाज कामरान गुलामही या सामन्यात खेळला.

Leave a comment