WTC Final 2023 : भारताचं पुन्हा स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलिया बनली टेस्ट चॅम्पियन!

WhatsApp Group

WTC Final 2023 IND vs AUS : टीम इंडियाचे पुन्हा एकदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तब्बल 209 धावांनी मोठा पराभव केला. यासह पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणारा ऑस्ट्रेलिया संघ कसोटीतील जगज्जेता संघ बनला आहे. पाचव्या दिवशी भारतीय संघासमोर 280 धावांचे विशाल लक्ष्य होते. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेवर सर्व भिस्त होती. पण स्कॉट बोलँड, नॅथन लायन यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दुसऱ्या डावात भारतीय संघ 63.3 षटकात 234 धावांवर बाद झाला.

पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात विराट कोहलीची खेळी संपुष्टात आली. स्कॉट बोलँडने कोहलीला दुसऱ्या स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले. कोहलीने 78 चेंडूंचा सामना करत 49 धावा केल्या. यादरम्यान त्याने सात चौकार मारले. स्कॉट बोलँडने भारताला दुसरा धक्का दिला. बोलँडने रवींद्र जडेजाला अॅलेक्स कॅरीकरवी विकेटच्या मागे झेलबाद केले. जडेजाला खातेही उघडता आले नाही. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. मिचेल स्टार्कने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. रहाणेने 108 चेंडूंचा सामना करत 7 चौकारांसह 46 धावा केल्या. केएस भरत (23) सुद्धा मोठी खेळी करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून या डावात नॅथन लायनने 4, बोलँडने 3, स्टार्कने 2 बळी घेतले.

हेही वाचा – WTC Final 2023 : स्टीव्ह स्मिथचा मॅचविनिंग झेल, विराट कोहली OUT! पाहा Video

संक्षिप्त धावफलक

  • नाणेफेक – भारत (गोलंदाजी)
  • ऑस्ट्रेलिया पहिला डाव – सर्वबाद 469 (ट्रॅव्हिस हेड 163, स्टीव्ह स्मिथ 121, मोहम्मद सिराज 108/4)
  • भारत पहिला डाव – सर्वबाद 296 (अजिंक्य रहाणे 89, पॅट कमिन्स 83/3)
  • ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 270/8 घोषित (अॅलेक्स कॅरी 66, रवींद्र जडेजा 58/3)
  • भारत दुसरा डाव – सर्वबाद 234 (विराट कोहली 49, नॅथन लायन 41/4)

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment