AUS vs NED World Cup 2023 In Marathi : वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा तब्बल 309 धावांनी दारुण पराभव केला आहे. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये खेळण्याचे जबरदस्त संकेत दिले. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये एकतर्फी झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. सलामीवीर डेव्हि़ड वॉर्नर आणि अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यांच्या दमदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सला 400 धावांचे आव्हान दिले. मॅक्सवेलने आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक (40 चेंडू) झळकावले. पण हे आव्हान नेदरलँड्सला पेलवले नाही. ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा आख्खा संघ फक्त 91 धावांवर बाद केला. मॅक्सवेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठे विजय (धावांमध्ये)
- 317 – IND vs SL, त्रिवेंद्रम 2023
- 309 – AUS vs NED, दिल्ली, आज*(WC)
- 304 – ZIM vs UAE, हरारे, 2023
- 290 – NZ vs IRE, ऍबरडीन 2008
- 275 – AUS vs AFG, पर्थ 2015 (WC)
वॉर्नरच्या सलग दुसऱ्या आणि मॅक्सवेलच्या जलद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्ससमोर 50 षटकात 8 बाद 399 धावा उभ्या केल्या. या सामन्यात वॉर्नरने 11 चौकार आणि 3 षटकारांसह 104 धावा केल्या. तर मॅक्सवेलने 44 चेंडूत 9 चौकार आणि 8 षटकारांसह 106 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय स्टीव्ह स्मिथने 71 आणि मार्नस लाबुशेनने 62 धावांची खेळी करत योगदान दिले. नेदरलँड्सकडून व्हॅन बीकने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – 4,4,6,6,6 ग्लेन मॅक्सवेलने ठोकले वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक!
प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा सलामीवीर विक्रमजित सिंगने संघासाठी सर्वाधिक 25 धावा केल्या. इतर फलंदाज 20 धावांच्या पुढेही पोहोचू शकले नाही. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने अवघ्या 8 धावांत 4 विकेट्स घेतल्या. मिचेल मार्शने 2 बळी घेतले, तर मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला. नेदरलँड्सला फक्त 21 षटके खेळता आली. ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक धावांनी विजयाची नोंद केली आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!