Asia Cup 2023 : आशिया चषक सुरु होण्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. केएल राहुल दुखापतीमुळे पहिल्या 2 सामन्यात खेळू शकणार नाही. त्यात भारत आणि पाकिस्तानच्या महत्त्वाच्या सामन्याचाही समावेश आहे. टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे. 30 ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. भारतीय संघाची गट फेरीतील दुसरी लढत 4 सप्टेंबर रोजी नेपाळशी होणार आहे. यानंतर सुपर-4 सामने खेळवले जाणार आहेत. आशिया चषकाच्या चालू हंगामात एकूण 6 संघ सहभागी होत आहेत. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ एका गटात आहेत. दुसरीकडे श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला दुसऱ्या गटात स्थान मिळाले आहे.
बीसीसीआयने प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा संदेश सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये द्रविडने म्हटले आहे की केएल राहुल चांगले पुनरागमन करत आहे, पण तो पाकिस्तान आणि नेपाळविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाही. अशा परिस्थितीत आता इशान किशनला यष्टीरक्षक म्हणून संधी मिळू शकते. राहुल दुखापतीमुळे बराच काळ बाहेर होता. तो सध्या संघासोबत बंगळुरू येथील प्रशिक्षण शिबिरात सहभागी होत आहे. यापूर्वीही अनेक खेळाडूंनी दुखापतीनंतर राहुलच्या पुनरागमनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा – Daily Horoscope : आज मकर राशीत चंद्राचा संचार, गजकेसरी योग! ‘या’ राशींना भरपूर लाभ
केएल राहुल व्यतिरिक्त, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर देखील आशिया कपपासून दुखापतीतून पुनरागमन करत आहे. अलीकडेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून परतले होते. दोन्ही गोलंदाजांनीही मालिकेत चांगली कामगिरी केली. यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा आशिया कपसाठी राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. अशा स्थितीत त्यालाही संधी मिळू शकते.
31 वर्षीय केएल राहुलने मार्च 2023 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. म्हणजेच जवळपास 6 महिने तो मैदानापासून दूर आहे. त्याने आतापर्यंत 54 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या 52 डावांमध्ये राहुलने 45 च्या सरासरीने 1946 धावा केल्या आहेत. त्याने 5 शतके आणि 13 अर्धशतके केली आहेत. 112 धावा ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!