Asia Cup 2022 : हाँगकाँगच्या टीमवर हसताय? त्यांचा स्ट्रगल वाचून डोळ्यात पाणी येईल! कुणी डिलिव्हरी बॉय, तर कुणी…

WhatsApp Group

Hong Kong Cricket : आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेच्या करो किंवा मरोच्या सामन्यात पाकिस्ताननं हाँगकाँगवर १५५ धावांनी विजय मिळवून सुपर फोरमध्ये प्रवेश केला. पाकिस्तानची लढत आता उद्या भारताविरुद्ध ४ सप्टेंबरला (रविवारी) होणार आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं मोहम्मद रिझवानच्या ७८ धावांच्या जोरावर २ बाद १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ १०.४ षटकांत ३८ धावांत आटोपला. क्रिकेटच्या दुनियेत हाँगकाँग संघाचं हसं होत असलं, तरी त्यांचा संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हाँगकाँग संघाचं वेळापत्रक अतिशय व्यस्त आहे. या तीन महिन्यांत त्यांनी नामिबिया, युगांडा, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, इंग्लंड, जर्सी आणि ओमानचा दौरा केला आहे.

या दौऱ्यांमुळे आपल्याला कोणतीही आर्थिक सुरक्षा, किंवा मोठी प्रसिद्धी मिळणार नाही, हे हाँगकाँगच्या खेळाडूंना माहीत होतं. पण तरीही ते त्यांच्या खेळासाठी पूर्णपणे समर्पित आहेत. त्यांचे तीन खेळाडू बाबर हयात, एहसान खान आणि यासीम मोर्तझा हे अलीकडेच वडील झाले आहेत. पण त्यांनी अजुन आपापल्या मुलांना प्रत्यक्षात पाहिलेलं नाही. एखाद्या मोठ्या संघात असं काही झालं असतं तर खेळाडू ब्रेकवर जातात किंवा पितृत्वाची रजा मंजूर करून घेतात.

हेही वाचा – Asia Cup 2022 : टीम इंडियाला जबर धक्का..! रवींद्र जडेजा स्पर्धेबाहेर; ‘या’ अष्टपैलू खेळाडूला संधी!

हाँगकाँगनं ओमानमधील आशिया चषक पात्रता फेरीतील तिन्ही सामने जिंकून आशिया चषकासाठी पात्रता मिळवली आणि भारत आणि पाकिस्तानसह ते अ गटात आले. गेल्या चार वर्षांत हा संघ भारत-पाकिस्तानसोबत कधीच खेळला नाही आणि या ‘मोठ्या संघां’सोबतचा त्यांचा पुढचा सामना कधी होईल हे त्यांना माहीत नाही. २०१८च्या आशिया चषकात त्यांनी भारताला कडवी झुंज दिली होती.

गेल्या तीन महिन्यांच्या अति क्रिकेटमुळं खेळाडू थकून न जावे, यासाठी हाँगकाँगचे मुख्य प्रशिक्षक ट्रेंट जॉन्स्टन प्रयत्नशील आहेत. ते म्हणाले, “कोरोनादरम्यान हाँगकाँग सहा वेळा लॉकडाऊनमध्ये होता. खेळाडूंना जवळपास वर्षभर सराव करता आला नाही. ते घर, पार्क आणि कार पार्किंगमधून झूम कॉलद्वारे मानसिक आणि कंडिशनिंग सेशन घेऊ शकले. त्याची लढाई प्रशंसनीय आहे. आशिया चषक पात्रता फेरीत आम्हाला तीन चांगले सामने मिळाले. यात भारत आणि पाकिस्तानचा समावेश होता.”

कोणी डिलिव्हरी बॉय, तर कोणी सरकारी नोकर…

कोरोनाचा काळ खेळाडूंसाठी सर्वात कठीण होता. हाँगकाँगसारख्या देशात क्रिकेट ही त्याची खेळाडूंसाठी आवड आहे आणि घर चालवण्यासाठी त्यांना इतर काही कामं करावी लागतात. त्यात समतोल साधण्यासाठी ते सतत धडपडत असतात. कोरोना लॉकडाऊनमुळे या अडचणी वाढल्या आहेत. तीन किंवा चार खेळाडू स्वतःची खासगी क्रिकेट कोचिंग अकादमी चालवतात. बहुतेक खेळाडू फूडपांडा आणि डिलिव्हरू कंपन्यांमध्ये डिलिव्हरी बॉय आहेत. उपकर्णधार किंचित शाह दागिन्यांच्या व्यवसायात आहेत, आकाश शुक्ला विद्यापीठात शिकतो आणि इतर काहीजण सरकारी नोकरीत प्रशासनाचं काम पाहतात. गेल्या तीन महिन्यांत सर्व खेळाडूंनी खूप त्याग केला आहे.

हाँगकाँगचे माजी खेळाडू काय करतायत?

हाँगकाँगची ही टीम तयार करणंही खूप कठीण झालं होतं. बरेच खेळाडू चांगले खेळतात पण त्यांना काही काळानंतर क्रिकेट सोडून अभ्यास किंवा इतर व्यवसाय करावा लागतो कारण इथं क्रिकेट हे करिअर नसतं. मागील आशिया चषक खेळलेल्या संघातील अनेक खेळाडूंनी आधीच क्रिकेट सोडलं आहे. तेव्हाचा यष्टिरक्षक फलंदाज ख्रिस कार्टर ऑस्ट्रेलियाला पायलटचं शिक्षण घेण्यासाठी गेला होता आणि आता तो कोणत्यातरी कंपनीत पायलट आहे. त्याचप्रमाणे त्यांचा माजी कर्णधार जेमी ऍटकिन्सन आता एका खासगी शाळेत शारीरिक शिक्षणाचा शिक्षक आहे. त्या स्पर्धेत संघाचा कर्णधार असलेला अंशुमन रथ आता भारतात परतला आहे आणि त्याला भारतीय पासपोर्ट मिळाल्यानंतर भारतासाठी देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल खेळायचं आहे.

हेही वाचा – …आणि नदालच्या नाकातून रक्त वाहू लागलं! लाइव्ह मॅचमध्ये काय घडलं? इथं पाहा VIDEO

मार्क चॅपमन आता न्यूझीलंडकडून खेळतो कारण त्याचे वडील न्यूझीलंडचे आहेत. तो हाँगकाँगमध्ये शालेय आणि वयोगटातील क्रिकेट खेळला पण नंतर ऑकलंडला अभ्यासासाठी निघून गेला आणि आता तो संभाव्य किवी संघ सहकारी आहे. तो सध्या न्यूझीलंड अ संघासोबत भारत दौऱ्यावर आहे. हाँगकाँग क्रिकेटसमोर आव्हाने आहेत. बरेच खेळाडू पाकिस्तानी वंशाचे आहेत. आणि त्यांना त्यांचे कुटुंब चालवण्यासाठी पाकिस्तानला पैसे पाठवावे लागतात. आशिया चषक स्पर्धेतील संघाच्या आशा आणि संभावनांबाबत संघाचे कोच ट्रेंट जॉन्स्टन अतिशय प्रामाणिक होते. त्यांना आधीच माहीत होतं, की संघ या स्पर्धएत जास्त काही करू शकत नाही. असं असलं तरी मेहनत करत राहणं या गोष्टीवर त्यांचा आणि हाँगकाँगच्या खेळाडूंचा ठाम विश्वास आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment