Asia Cup 2022 : पाकिस्तानच्या बॅट्समनचा रडीचा डाव..! आऊट झाल्यानंतर बॉलरवर उचलली बॅट; पाहा VIDEO

WhatsApp Group

Asia Cup 2022 : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मैदानावरील कामगिरीवरून जितकी चर्चा होते, तितकीच जास्त चर्चा चुकीच्या कारणांसाठी होते. आशिया चषक २०२२ मध्येही असंच काहीसे पाहायला मिळालं, जिथं पाकिस्ताननं अफगाणिस्तानला एका अत्यंत महत्त्वाच्या आणि जबरदस्त सामन्यात अवघ्या १ गडी राखून पराभूत केलं आणि अंतिम फेरीत धडक मारली. चुरशीची स्पर्धा आणि थरार या दोन्हीसाठी हा सामना कायम लक्षात राहणार असला, तरी पाकिस्तानचा स्फोटक फलंदाज आसिफ अली याच्या एका वाईट कृतीनं या सामन्याला गालबोट लागलं.

बुधवार ७ सप्टेंबरचा शारजाहमधील सामना अनेक अर्थांनी महत्त्वाचा होता. पाकिस्तानला अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच संधी होती, तर अफगाणिस्तानसाठी ही शेवटची संधी होती. त्याचवेळी भारतीय संघही अफगाणिस्तानवर अवलंबून होता, त्यासाठी अफगाणिस्तानचा विजय आवश्यक होता. पाकिस्तानला १३० धावांची गरज होती, पण अफगाणिस्ताननं सामन्यात सर्वस्व झोकलं

काय घडलं नेमकं?

पडत्या विकेट्समुळे पाकिस्तानला शेवटच्या २ षटकात २१ धावांची गरज होती आणि ३ विकेट शिल्लक होत्या. त्यानंतर १९व्या षटकात वेगवान गोलंदाज फरीद अहमदनं हारिस रौफला बोल्ड केलं, पण आसिफ अली क्रीजवर होता. षटकाच्या चौथ्या चेंडूवर आसिफनं शानदार षटकार ठोकला पण पुढचा चेंडू खूपच आखुड असल्यानं त्याला योग्य फटका मारता आला नाही. त्याचा झेल शॉर्ट फाईन लेगवर घेण्यात आला आणि पाकिस्तानने नववी विकेट गमावली. इथेच सगळा गदारोळ झाला. विकेट पडताच अफगाण गोलंदाज आसिफच्या अगदी समोर गेला आणि त्यानं हवेत मुठ मोठ्या उत्साहात उंचावली, ज्यामुळं आसिफ अस्वस्थ झाला. भावनांवर ताबा न ठेवता त्यानं आधी हात वर केला आणि नंतर बॅट फरीदच्या दिशेनं उचलली.

हेही वाचा की – Asia Cup 2022 : इंडिया क्वालिफाय फॉर मुंबई एअरपोर्ट..! श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर मीम्सचा महापूर! पाहा…

आसिफ आणि फरीद यांच्यातील बिघडलेलं वातावरण पाहून लगेच पंच आणि इतर अफगाणिस्तानचे खेळाडू मदतीला आले. हाणामारी सुरू होण्यापूर्वी दोघे वेगळे झाले. आसिफनं ८ चेंडूत १६ धावा केल्या. युवा गोलंदाज नसीम शाहनं शेवटच्या षटकात लागोपाठ दोन षटकार खेचले असले तरी आसिफ अलीच्या कृतीने संपूर्ण खेळच चर्चेत आला. अशा परिस्थितीत दोघांवर कडक कारवाई झाली आहे. आयसीसीनं आसिफ अली आणि फरीद यांना दंड ठोठावला असून त्यांच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली आहे.

भारत बाहेर

अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाही बाहेर पडली आहे. भारतीय संघ सुपर-४ मध्ये सलग दोन सामने हरला आहे. टीम इंडिया आता अंतिम फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडली आहे. त्याचबरोबर आशिया कप २०२२ चा अंतिम सामना आता ११ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment