Asia Cup 2022 IND vs PAK : बाबरसेनेकड़ून हिशोब बरोबर..! भारताला १८व्या ओव्हरमधील चूक नडली; पाकिस्तान विजयी!

WhatsApp Group

Asia Cup 2022 : बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघानं पराभवाचा बदला घेत भारताला (IND vs PAK) मात दिली आहे. आशिया कपमध्ये दुबईच्या मैदानावर रंगलेल्या चित्तथरारक सामन्यात पाकिस्ताननं टीम इंडियाला ५ गड्यांनी हरवलं. नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं प्रथम भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची वादळी सुरुवात आणि विराट कोहलीचं सलग दुसरं अर्धशतक याच्या जोरावर भारतानं पाकिस्तानला १८२ धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरात फॉर्मात असलेल्या मोहम्मद रिझवाननं ७१ धावांची जबरदस्त खेळी केली. १८व्या षटकात अर्शदीप सिंगनं आसिफ अलीचा सोपा झेल सोडला आणि पाकिस्ताननं या जीवदानाचा फायदा उचलत विजय मिळवला.

पाकिस्तानचा डाव

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा कप्तान बाबर आझम (१४) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. फिरकीपटू रवी बिश्नोईनं त्याला रोहितकरवी झेलबाद केलं. त्यानंतर मोहम्मद रिझवाननं संघाची सुत्रं हातात घेतली. त्यानं मोहम्मद नवाजसोबत संघाचं शतक फलकावर लावलं. १६व्या षटकात नवाजला भुवनेश्वरनं हुडाकरवी झेलबाद केलं. नवाजनं २० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ४२ धावांची स्फोटक खेळी केली. अर्धशतक ठोकलेला रिझवान १७व्या षटकात हार्दिकच्या गोलंदाजीवर झेल देऊन बाद झाला. त्यानं ५ चौकार आणि २ षटकारांसह ७१ धावा केल्या. १८व्या षटकात आसिफ अलीला अर्शदीप सिंगनं जीवदान दिलं. याच जीवदानाचा फायदा पाकिस्ताननं उचलला. एक चेंडू राखून पाकिस्ताननं भारताला मात दिली. आसिफ अलीनं २ चौकार आणि एका षटकारासह १६ धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर, अर्शदीप, बिश्नोई, चहल आणि पंड्यानं प्रत्येकी एक बळी घेतला.

हेही वाचा – IND Vs PAK : जोशा जोशात घातला घोळ..! टॉसदरम्यान शास्त्री मास्तरांचा ‘मोठा’ गोंधळ; VIDEO व्हायरल

भारताचा डाव

केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या षटकापासून हाणामारीला सुरुवात केली. रोहितनं टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकण्याच्या अंदाजातच फलंदाजी केली. राहुल सुरुवातीला सावध राहिला, पण रोहितचा आक्रमकपणा पाहून तोसुद्धा मोठे फटके खेळला. दोघांची अर्धशतकी भागीदारी सहाव्या षटकापर्यंतच पूर्ण झाली. हारिस रौफनं रोहितला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. रोहितनं ३ चौकार आणि २ षटकारांसह २८ धावा केल्या. पुढच्याच षटकात शादाब खाननं राहुलला झेलबाद केलं. राहुलनं १ चौकार आणि २ षटकारांसह २८ धावा केल्या. चांगल्या फॉ़र्मात असलेल्या सूर्यकुमार यादवला (१३) आणि ऋषभ पंतला (१४) आज जास्त काही करता आलं नाही. पहिल्या सामन्याचा हिरो हार्दिक पंड्या खातंही खोलू शकला नाही. मोहम्मदद हसनैननं त्याला नवाजकरवी झेलबाद केलं. विराट कोहलीनं एक बाजू लावून धरत फलंदाजी केली. १८व्या षटकात विराटनं सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. शेवटच्या षटकात विराट धावबाद झाला. त्यानं ४ चौकार आणि एका षटकारासह ६० धावा केल्या. २० षटकात भारतानं ७ बाद १८१ धावा केल्या. पाकिस्तानकडून शादाबनं २ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

भारत – केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान – मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment