Asia Cup 2022 : मागील वर्षी टी-२० वर्ल्डकपमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला भारतीय क्रिकेट संघानं घेतला आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियानं पाकिस्तानला (IND vs PAK) ५ गड्यांनी मात दिली. या विजयासह भारतानं स्पर्धेत विजयाचं खातं उघडलं. टॉस जिंकून भारतानं पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्याच्या तिखट माऱ्यासमोर पाकिस्तान १४७ धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत भारताला विजय मिळवून दिला. हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. याच मैदानावर पाकिस्ताननं भारताला पहिल्यांदा वर्ल्डकपमध्ये धूळ चारली होती.
भारताचा डाव
पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पाकिस्तानचा पदार्पणवीर वेगवान गोलंदाज नसीम शाहनं केएल राहुलला खातंही खोलू दिलं नाही. त्यानं राहुलचा त्रिफळा उडवला. त्यानंतर विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मानं संघाचं अर्धशतक ओलांडलं. फिरकीपटू मोहम्मद नवाजनं रोहित आणि विराट या दोघांना झेलबाद करत भारताला संकटात टाकलं. रोहितनं १२ धावा केल्या. तर विराटनं ३ चौकार आणि एका षटकारासह ३५ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवही (१८) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. नसीमनं त्याला बोल्ड केलं. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकी भागीदारी रचत भारताला विजयाजवळ नेले. २०व्या षटकात जडेजा बाद झाला. त्याने २ चौकार आणि २ षटकारांसह ३५ धावा केल्या. त्यानंतर हार्दिकनं दिनेश कार्तिकसह १९.४ षटकारत विजयावर शिक्कामोर्तब केले. हार्दिकनं ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३३ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजनं ३ तर नसीम शाहनं २ बळी घेतले.
WHAT. A. WIN!#TeamIndia clinch a thriller against Pakistan. Win by 5 wickets 👏👏
Scorecard – https://t.co/o3hJ6VNfwF #INDvPAK #AsiaCup2022 pic.twitter.com/p4pLDi3y09
— BCCI (@BCCI) August 28, 2022
Hardik Pandya finishes things off in style 🎉#INDvPAK #AsiaCup2022 pic.twitter.com/O7e4UcWbL0
— BCCI (@BCCI) August 28, 2022
हेही वाचा – IND Vs PAK Asia Cup 2022 : ‘‘मी स्वतःला सुपरस्टार समजत होतो, पण…”, विजय देवरकोंडाला कळलं सत्य!
Hardik "The All-rounder" seals the deal with a six for Men In Blue ♥️🤩#HardikPandya #India #INDvsPAK #Cricket #AsiaCup pic.twitter.com/Lmjh9uys65
— Wisden India (@WisdenIndia) August 28, 2022
पाकिस्तानचा डाव
टी-२० वर्ल्डकप २०२१ मध्ये भारताविरुद्ध स्फोटक सलामी दिलेली बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानची जोडी आज खास कमाल करू शकली नाही. भारताचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमला (१०) स्वस्तात झेलबाद केलं. त्यानंतर पॉवरप्लेमध्ये पाकिस्ताननं फखर जमानला (१०) गमावलं. आवेश खाननं त्याला यष्टीपाठी झेलबाद केलं. एका बाजूनं किल्ला लढणारा मोहम्मद रिझवान अर्धशतकापूर्वी बाद झाला. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानं रिझवानला बाद करत पाकिस्तानला जबर धक्का दिला. रिझवाननं ४ चौकार आणि एका षटकारासह ४३ धावा केल्या. यानंतर भुवनेश्वर आणि हार्दिकनं पाकिस्तानला सुरूंग लावला. १९व्या षटकात भुवनेश्वरनं दोन बळी घेतले. १९.५ षटकात पाकिस्तानचा डाव १४७ धावांवर आटोपला. भुवनेश्वरनं २६ धावांत ४ बळी घेतले, हार्दिकला ३ तर अर्शदीपला २ बळी घेता आले.
हेही वाचा – IND Vs PAK Asia Cup 2022 : विराट कोहलीनं ठोकलं शतक; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव!
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान – बाबर आझम (कप्तान), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, फखर अहमद, खुशदल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हारिस रौफ, शाहनाझ दहानी.