Asia Cup 2022 : टीम इंडिया बाहेर पडलीय का? फायनलमध्ये पोहोचेल का? इथं वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरं!

WhatsApp Group

Team India in Asia Cup 2022 : आशिया कप २०२२च्या सुपर फोर टप्प्यात टीम इंडियाला सलग दुसऱ्या पराभवाला (IND vs SL) सामोरं जावं लागलं आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं भारताचा सहा गडी राखून पराभव केला. भारतानं श्रीलंकेला १७४ धावांचे लक्ष्य दिलं होते, जे त्यांनी एक चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केलं. पाकिस्तान आणि आता श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाला आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचणं कठीण झालं आहे. आता या स्पर्धेत टिकण्यासाठी टीम इंडियाला पूर्णपणे इतर संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे. विशेषत: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावर सर्व काही अवलंबून असेल.

भारत जवळपास बाहेर!

आज (७ सप्टेंबर) पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना आहे. पाकिस्ताननं आज विजय मिळवल्यास भारत स्पर्धेबाहेर होईल आणि त्यानंतर त्यांचा शेवटचा सामना ही केवळ औपचारिकता राहील. जर पाकिस्तानचा संघ आज जिंकला तर अफगाणिस्तान आणि भारत हे दोन्ही संघ आशिया कपमधून बाहेर होतील. अशा स्थितीत ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात लढत होईल. तसे, श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवानंतर एक गोष्ट निश्चित आहे की, आता ११ सप्टेंबरला भारत-पाकिस्तानमध्ये अंतिम सामना होणार नाही.

हेही वाचा – Asia Cup 2022 : हाँगकाँगच्या टीमवर हसताय? त्यांचा स्ट्रगल वाचून डोळ्यात पाणी येईल! कुणी डिलिव्हरी…

भारत अंतिम फेरीत कसा पोहोचेल?

आता दोन पराभवानंतर भारतीय संघ अंतिम फेरीत स्थान मिळवू शकणार का, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. याचं उत्तर होय आहे, टीम इंडियाच्या आशा अजून संपलेल्या नाहीत. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्या पुढील सामन्यांवर अवलंबून राहावं लागणार आहे. आता भारताला अफगाणिस्तानविरुद्धचा पुढील सामना मोठ्या फरकानं जिंकावा लागणार आहे.

यासोबतच श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या संघांनी पाकिस्तानला पराभूत करण्याची प्रार्थना भारताला करावी लागेल. असं झाल्यास तीन सामने जिंकून अंतिम फेरी गाठणारा श्रीलंका पहिला संघ ठरेल. तर भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान प्रत्येकी एक विजयासह सुपर फोर फेरी पूर्ण करतील. येथे जो संघ नेट रन रेटमध्ये चांगला असेल तो पुढे जाईल.

हेही वाचा – ‘ही’ आहेत प्राचीन भारताची सर्वात शक्तिशाली अस्त्रं…म्हणजे ब्रह्मास्त्रापेक्षाही खतरनाक!

आशिया कप २०२२ च्या सुपर-फोर टेबलमध्ये, श्रीलंका दोन सामन्यांतून चार गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडं, पाकिस्तानचा संघ दोन गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही देशांचा नेट रनरेट + मध्ये आहे. भारत आणि अफगाणिस्तान संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. भारताचा नेट रन रेट सध्या -०.१२५ आहे.

रोहित शर्माची शानदार खेळी

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी लवकरच दोन विकेट गमावल्या. यानंतर रोहितनं सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करत भारतीय डावाचा ताबा घेतला. रोहित शर्मानं ४१ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांसह ७२ धावा केल्या. सूर्यानं २९ चेंडूत ३४ धावांची खेळीही खेळली. या दोघांच्या शानदार खेळीमुळं भारताला २० षटकांत आठ गडी गमावून १७३ धावा करता आल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment