मुंबई : प्रसिद्ध WWE (वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट) रेसलर दलीप राणा उर्फ ’द ग्रेट खली’ याच्यावर पंजाबमधील फिल्लौर जवळील लाडो टोल प्लाझा येथील कर्मचाऱ्याला कानाखाली मारल्याचा आरोप होत आहे. खलीचा एक व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या व्हिडिओत खली आणि टोल कर्मचाऱ्याचे भांडण दिसत आहे. खली जालंधरहून कर्नालला जात असताना हा वाद झाला.
काय घडलं?
खलीनंही टोल कर्मचाऱ्यांवर गैरवर्तन केल्याचा आरोप केलाय. तो म्हणाला, ”टोल कर्मचाऱ्यांना गाडीत बसून त्याच्यासोबत फोटो काढायचा होता, त्यानं नकार दिल्यावर कर्मचाऱ्यांनी त्याच्यासोबत हुज्जत घातली.” कर्मचार्यांचा आरोप आहे, की त्यांनी खलीकडं त्याचं ओळखपत्र मागितलं होतं, ज्यावर त्यानं टोल कर्मचाऱ्याला कानाखाली मारली. व्हिडीओमध्ये खलीकडे ओळखपत्र नसल्याचंही ऐकायला मिळत आहे.
Viral Video of Argument between WWE Superstar 'The Great #Khali' and Toll workers, Somewhere In Punjab. pic.twitter.com/MsCdPslcLs
— Nikhil Choudhary (@NikhilCh_) July 11, 2022
वाद चिघळल्यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी फोन करून पोलिसांना बोलावलं. खलीनं एका कर्मचाऱ्याला कानाखाली मारल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आणि ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यानं दोन्ही बाजूंना समजावून सांगितलं, त्यानंतर खली लाडो टोल प्लाझा येथून निघून गेला.
खलीची कारकीर्द
‘द ग्रेट खली’ या नावाने प्रसिद्ध असलेलां दलीप सिंग राणा हा हिमाचलच्या सिरमौर जिल्ह्यातील घिरिना या छोट्या गावातील आहेत. एका छोट्या गावातून बाहेर पडून खलीनं संपूर्ण जगात आपला ठसा उमटवला. WWE रेसलिंगमध्ये करिअर करण्यापूर्वी तो पंजाब पोलिसात होता. त्यानं अनेक हॉलिवूड, बॉलीवूड चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमध्येही काम केलं आहे. खलीनं जानेवारी २००६ मध्ये WWEसोबत करार केला आणि त्याच वर्षी त्यानं स्मॅकडाउनच्या एका एपिसोडमध्ये पदार्पण केलं. यानंतर, द ग्रेट खली २० मॅन बॅटल रॉयल सामना जिंकून WWE वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन बनला. खली WWE मध्ये हे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय सुपरस्टार ठरला. खलीनं त्याचा शेवटचा WWE सामना २०१४ साली खेळला आणि त्यानंतर तो WWE टेलिव्हिजनवर काही खास प्रसंगी दिसला. गेल्या वर्षी खलीला WWE हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करताना कंपनीने सन्मानित केलं होतं.
पंजाब निवडणुकीदरम्यान खलीनं भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यानं निवडणूक लढवली नाही. खली म्हणाला होता, की WWE मध्ये खूप नाव आणि पैसा आहे पण तो देशाची सेवा करण्यासाठी परतला आहे. खलीनं २०१५ मध्ये CWE नावाची रेसलिंग स्कूल सुरू केली. तो जालंधरमध्ये स्वतःची कॉन्टिनेंटल रेसलिंग अकादमी चालवतो आणि पंजाबच्या तरुणांच्या प्रतिभेला जोपासण्यासाठी काम करतो.