नाद नाद नादच..! ८२ वर्षाच्या माजी आमदाराची कमाल; भारतासाठी जिंकली २ पदकं!

WhatsApp Group

मुंबई : ९४ वर्षांच्या आजी भगवानी देवी डागर यांच्यानंतर आता ८२ वर्षांचे आजोबा म्हणजेच एमजे जेकब यांनी २०२२ च्या वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचं नाव उंचावलं आहे. या स्पर्धेत भगवान देवी यांनी १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं. आता केरळचे माजी आमदार एमजे जेकब यांनी चॅम्पियनशिपमध्ये २०० मीटर आणि ८० मीटर हर्डल्स शर्यतीत कांस्यपदक जिंकलंय. २९ जून ते १० जुलै २०२२ दरम्यान फिनलंडमधील टेम्पेरे येथे चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत ८२ देशांनी भाग घेतला होता. भारत एक सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांसह ३६ व्या स्थानावर आहे. या स्पर्धेत एका सुवर्णाशिवाय भगवान देवी यांनी दोन कांस्यपदकंही जिंकली आहेत.

२००६च्या केरळ विधानसभा निवडणुकीत सीपीआय (एम) नेते जेकब यांनी पिरावोम मतदारसंघात ४ वेळा आमदार टीएम जेकब यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांना अॅथलेटिक्स संमेलनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलं. एमजे जेकब, त्यांच्या कॉलेजमध्ये ट्रॅक आणि फील्डमध्ये चॅम्पियन होते, आता त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आणि १०० मीटर शर्यतीत भाग घेतला. तेव्हा त्यांना पदक मिळालं नसलं तरी आता १६ वर्षांनंतर वयाच्या ८१व्या वर्षी जेकब यांनी अॅथलेटिक्सवरील प्रेम पुन्हा जागृत केले आणि जागतिक स्तरावर यश संपादन केलं.

विजयानंतर प्रतिक्रिया

आधीच अनेक राष्ट्रीय आणि आशियाई मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये विजेते एमजे जेकब यांनी वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ मध्ये मोठ्या वयोगटात दोन पदकं जिंकली. ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे खेळाडू मास्टर्स चॅम्पियनशिपमध्ये भाग घेऊ शकतात. जेकब यांनी फिनलंडमधील विजयानंतर सांगितले, “जागतिक स्तरावर वैयक्तिक स्पर्धेत पदक जिंकण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. ही मोठी उपलब्धी आहे की नाही हे मला माहीत नाही. पण अर्थातच ते समाधानकारक आहे.”

जेकब यांनी यापूर्वी फ्रान्स (२०१५), ऑस्ट्रेलिया (२०१६) आणि स्पेन (२०१८) येथे झालेल्या जागतिक मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. त्यांनी जपान (२०१४), सिंगापूर (२०१६), चीन (२०१७) आणि मलेशिया (२०१२) येथे एशियन मास्टर्समध्येही भाग घेतला. नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांना भाग घ्यायचा होता, मात्र काही समस्यांमुळे त्यांना ही स्पर्धा सोडावी लागली.

जेकब यांचा ‘फिट’ दिनक्रम

केरळमधील बहुतेक राजकारण्यांसाठी स्वत:साठी वेळ काढणं ही मोठी गोष्ट मानली जाते, परंतु जेकब अजूनही सराव करतात. ते म्हणाले, ”मी सकाळी लवकर उठतो, पहाटे चारच्या सुमारास, आणि किमान चार किमी धावतो. काही दिवस मी योगाही करतो. मी सकाळी इतर कामांमध्ये व्यस्त होण्यापूर्वी, मी माझ्या शारीरिक हालचाली पूर्ण करत असल्याची खात्री करतो. पाऊस पडत असला तरी मी माझी सकाळची धाव चुकणार नाही, याची काळजी घेतो. मी जे करतो ते विशिष्ट कसरत नाही, पण स्पर्धांसाठी स्वत:ला तयार करण्यासाठी मी ते दररोज करतो.”

Leave a comment