Shivsena makes alliance with Sambhaji Brigade : महाराष्ट्राच्या राजकारणात आज (२६ ऑगस्ट) एक मोठी घटना घडली आहे. उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेनं राज्यातील संभाजी ब्रिगेड या संघटनेशी हातमिळवणी केली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना पुढील सर्व निवडणुका संभाजी ब्रिगेडसोबत एकत्र लढेल. मात्र, यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी ही युती निवडणुकीसाठी आहे, असं म्हणणं योग्य नसल्याचं सांगितलं. लोकशाही आणि प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी ही युती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी आम्हाला सोडलं हे चांगलं झालं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
ठाकरे पुढं म्हणाले, ”मराठ्यांना दुहीचा शाप आहे. औरंगजेबानं त्यावेळी म्हटलं होतं की जगाच्या इतिहासात पहाडी मुलखामध्ये मराठ्यांना पराक्रमाच्या बाबतीत तोड नाही. पण या जमिनीत दुहीची बीजं दगडांवर जरी फेकली तरी एवढी रुजतात आणि फोफावतात, की तमाम दौलत संपवून टाकतात. हा शाप आजपर्यंत आपल्याला गाडून टाकत आला. आता आपण एकत्र आलोय, नवीन इतिहास रचूया, दुहीलाच गाडून टाकूया.
हेही वाचा – पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीला भेटले विराट, चहल आणि पंत! VIDEO जिंकतोय लाखोंची मनं
मोठी घडामोड… महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना नवं समीकरण उदयाला. शिवसेनेच्या पाठिशी उभं राहण्याचा संभाजी ब्रिगेडचा निर्णय. यापुढच्या निवडणुकाही संभाजी ब्रिगेड शिवसेनेसोबत लढणार. #Shivsena #SambhajiBrigade
— Abhijit Karande (@AbhijitKaran25) August 26, 2022
”निवडणुकीमध्ये खांद्याला खांदा लावून काम करु. मला एक तगडा साथीदार मिळालाय. संभाजी ब्रिगेडच्या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो. गेला महिना-दीड महिना शिवसेनेच्या विचारांशी लांब असणारे लोकही मला येऊन भेटत आहेत. आपण आता संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, प्रादेशिक अस्मिता वाचविण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, असं लोक सांगत आहेत”, असंही ठाकरे म्हणाले.
#UddhavThackeray #Shivsena #sambhajibrigade #vachamarathi pic.twitter.com/1BGEUgr7ov
— Vacha Marathi (@VachaMarathi) August 26, 2022
संभाजी ब्रिगेड काय आहे?
१ सप्टेंबर १९९० रोजी पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाची अकोल्यात स्थापना केली. पुरुषोत्तम खेडेकर सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता पदावर होते. मराठा-कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावर आणून त्यांचं संघटन उभं करणं हा उद्देश त्यावेळी होता. मराठा सेवा संघाची एक शाखा म्हणजे संभाजी ब्रिगेड. ५ जानेवारी २००४ रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला संभाजी ब्रिगेडनं केला. या हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेड या संस्थेचं नाव महाराष्ट्रभर झालं. २०१०मध्ये लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्याच्या आंदोलनात संभाजी ब्रिगेड पुढं होती, कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत, म्हणून त्यांच्या नावानं राज्य शासनाचा पुरस्कार रद्द करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली होती.
हेही वाचा – मुंबईत ना दिल्लीत, एलोन मस्कचा ‘हा’ मराठमोळा मित्र राहतो पुण्याच्या गल्लीत!
संभाजी ब्रिगेडनं बाबासाहेब पुरंदरेंनाही विरोध केलाय. पुरंदरेंनी संभाजी महाराजांविषयी चुकीच्या गोष्टी मांडून बदनामी केल्याचा सातत्यानं आरोप संभाजी ब्रिगेडकडून केला जातो. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली होती. ‘रेनेसाँ स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या कुबेरांच्या पुस्तकात संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप ब्रिगेडनं ठेवला होता. नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कुबेरांवर शाईफेक करण्यात आली. ३० नोव्हेंबर २०१६ मध्ये संभाजी ब्रिगेडनं स्वत:ला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं.